आर्थिक संकटात शेतकऱ्यांना ‘बांबू’चा आधार

134

देशासह राज्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे छोट्या-मोठ्या उद्योगांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना देखील कोरोना महामारीत आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र या आर्थिक संकटात देखील कोकणातील शेतकऱ्यांना ‘बांबू’ने आधार दिला आहे. बांबूने नेमका कसा काय आधार दिला असा प्रश्न साहजिकच तुम्हाला पडला असेल..पण या आर्थिक संकटात देखील तळकोकणातील बांबूची शेती करणाऱ्याला शेतकऱ्यांना आणि बांबू व्यापाऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सध्या बांबू तोड जोरात सुरु असून, ऐन लॉकडाऊनमध्ये देखील शेतकऱ्यांच्या हातात बांबूच्या उत्पन्नातून काम आणि पैसे मिळू लागले आहेत.

अन् महामारीतही ‘अच्छे दिन’

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार केला तर रिक्षा, हॉटेल, लाकूड तोड, बांधकाम इत्यादी व्यवसाय लॉकडाऊनमुळे ठप्प झाले आहेत. या महामारीत चाकरमान्यांचे देखील आर्थिक कंबरडे मोडले आहे. याचे गंभीर परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर पडू लागले आहेत. यापुढे आणखी गंभीर परिस्थिती वळण घेऊ शकेल. परंतू सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही वर्षात ज्या शेतकऱ्यांनी बांबू लागवड केली त्यांना मात्र या महामारीतही चांगले दिवस आले आहेत. जून महिन्यात बांबूची कंदमुळे विकून अनेकांनी चांगले पैसे कमविले तर त्यानंतर आता जुलै, ऑगस्ट महिन्यात बांबू तोड सुरु झाली आहे. सध्या लाकूड व्यापार बंद असल्याने अनेक व्यापारी बांबू व्यवसायाकडे वळले आहेत. तसेच बुडत्याला काडीचा आधार त्याप्रमाणे ज्या शेतकऱ्यांच्या दारवळीत बांबू बेटी आहेत त्या शेतकऱ्याना बांबूतून पैसे मिळत असून, सणासुदीच्या दिवसात चांगला आधार मिळाला आहे.

असे मिळते उत्पन्न

एक एकर बांबूच्या लागवडीत सुमारे ३ लाखांपर्यंत नफा होत असून, बांबूच्या आकारानुसार बांबूची किंमत ठरवली जाते. विशेष म्हणजे बांबूच्या लागवडीसाठी सरकारकडून सबसीडी देखील दिली जाते. सरकारकडून हेक्टरी दोन लाख रुपये सबसीडी शेतकऱ्याला दिली जाते.

बांबूचे प्रकार आणि किंमत

तळकोकणात चिवा आणि मानगा असे दोन बांबूचे प्रकार असून, चिवा काठी ५० रुपये तर मानगा प्रकारातला बांबू ८० रुपयांनी विकला जातो. चिवा काठीचे बेट हे सुमारे १०० ते १५० वर्षे उत्पन्न देते तर मानगा ३० ते ४० वर्षांपर्यंत उत्पन्न देते.

आमच्या शेतातील बांबू सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कॉनबॅक प्रक्रिया उद्योग आणि कर्नाटकला जातो. सध्या बांबूला एवढी मागणी आहे की, दिवसाला दोन तीन बांबू व्यापाऱ्यांचे मागणीसाठी फोन येत असतात. परंतू आम्ही जो व्यापारी बांबू सांभाळून तोडतो त्यांनाच बांबू तोडीचे काम देतो.
सुनील सावंत, शेतकरी

माझ्या शेतातील बांबूला मोठी मागणी आहे. परंतु फुटणाऱ्य नव्या कोंबाचे नुकसान होऊ शकते म्हणून मी या दिवसात बांबू तोडायला देत नाही. आम्ही नेहमी ऑक्टोबर महिन्यानंतर बांबू तोडायला देत असतो.
संतोष खोत, शेतकरी

वैभववाडी तालुक्यात सध्या बांबू तोड सुरु आहे. त्यातून अनेक छोट्या बांबू व्यापारी आणि मजुरांना काम मिळत आहे.चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचा फायदा होत आहे. बांबूला मोठी मागणी आहे. शेतकरी आता कुठे चिवा काठीची लागवड करू लागले आहेत. तेवढा पुरवठा होत नाही. वैभववाडी तालुक्यात पारंपरिक चिवा काठी आढळून येते. ही काठी भरीव असून, तिला मोठी मागणी आहे
विजय रावराणे, व्यापारी

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.