तुकाराम मुंढेंच्या बदली मागे ठाकरे सरकारच्या दोन मंत्र्यांचा ‘हात’

159

बदलीला कधीही न घाबरणाऱ्या तुकाराम मुंढे यांची ठाकरे सरकारच्या काळात दुसऱ्यांदा बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीनंतर सगळीकडून विरोधाचा सूर उमटत असतानाच आता तुकाराम मुंढे यांच्या बदली मागे ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांचा हात असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे. हे दोन्ही मंत्री काँग्रेस पक्षाचे असून, या दोन्ही मंत्र्यांनी काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन तुकाराम मुंढे यांची नागपूर पालिका आयुक्त पदावरून बदली करावी अशी मागणी केली होती.

बदलीसाठी मंत्र्यांचा दबाव

गेल्या काही दिवसांपासून अधिकाऱ्यांच्या बदल्या या मंत्र्यांना विश्वासात न घेता केल्या जातात असा आरोप ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत केला होता. तसेच मंत्री आणि स्थानिक लोकप्रतिनिधींना न जुमानणाऱ्या नागपूर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबाबत उर्जामंत्री नितीन राऊत, आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी मुख्यमंत्र्यांसमोर नाराजी व्यक्त करत त्यांच्या बदलीची मागणी केली होती. अखेर या दोन्ही मंत्र्यांच्या या दबावामुळे तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आता अधिकारी वर्गात रंगू लागली आहे.

गडकरींचीही नाराजी भोवली

एकीकडे ठाकरे सरकारमधील दोन मंत्र्यांची नाराजी आणि दुसरीकडे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दबावामुळे अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मनात नसताना देखील तुकाराम मुंढे यांची बदली करावी लागल्याची चर्चा आता मंत्रालयामध्ये सुरु आहे. तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न आणि हेकेखोरपणा यामुळे ज्येष्ठ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खूप नाराज होते.

मुढेंच्या बदलीनंतर ‘आप’ आक्रमक

मुंढे यांच्या बदलीनंतर आप आक्रमक झाली आहे. आज चार वाजता आम आदमी पार्टीकडून मुंढे यांच्या समर्थनार्थ आणि बदलीच्या विरोधात नागपुरात आंदोलन करणार आहेत.

१५ वर्षांत १४ बदल्या

२००६-०७ – महापालिका आयुक्त, सोलापूर

२००७ – प्रकल्प अधिकारी, धारणी

२००८ – उपजिल्हाधिकारी, नांदेड

२००८ – सीईओ, नागपूर जिल्हा परिषद

२००९ – अति. आदिवासी आयुक्त, नाशिक

२०१० – के. व्ही. आय. सी. मुंबई

२०११ – जिल्हाधिकारी, जालना

२०११-१२ – जिल्हाधिकारी, सोलापूर

२०१२ – विक्रीकर विभाग, सहआयुक्त, मुंबई

२०१६ – महापालिका आयुक्त, नवी मुंबई

२०१७ – पिंपरी-चिंचवड परिवहन, पुणे

२०१८ – महापालिका आयुक्त, नाशिक

२०१८ – नियोजन विभाग, मंत्रालय

२०१८ – महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी

२०२० – नागपूर मनपा आयुक्त

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.