२८ मे २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या १३९व्या जयंतीदिनी सकाळी ११ वाजता त्यांचे जन्मस्थळ असलेल्या नाशिकजवळच्या भगूर येथील सावरकर वाड्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाने निर्मिती केलेल्या ‘समाजक्रांतिकारक सावरकर (रत्नागिरी पर्व)’ या माहितीपटाचे लोकार्पण करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचलनालयाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांच्याहस्ते हे लोकार्पण होणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असणाऱ्या भगूर वाड्यात असलेल्या वस्तुसंग्रहालयात २८ मे २०२२ पासून दररोज या माहितीपटाचा लाभ भगूर येथील या वाड्याला भेट देणाऱ्यांना घेता येणार आहे. सुमारे एक तासाचा हा लघुपट आहे.
(हेही वाचाः समाजक्रांतिकारकाची यशोगाथा : स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या रत्नागिरी पर्वाचा ‘महती’पट)
समाजक्रांतिकारक सावरकर
या माहितीपटात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरी येथील आपल्या स्थानबद्धतेच्या काळात जी समाजक्रांतिकारी कामगिरी केली, ज्याममध्ये पतितपावन मंदिरात जातिभेद संपुष्टात आणण्यासाठी केलेला सर्व हिंदुंसाठीचा मंदिरप्रवेश, स्पृश्यास्पृश्यांची दरी संपवणारे सहभोजनाचे आयोजन, हळदीकुंकू समारंभाचे आयोजन, हिंदुधर्मातील सात बेड्यांना तोडण्याचे कार्य करून त्याकाळात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केलेले कार्य हे समाज क्रांतिकारकाचेच होते. त्यांच्या या कार्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून सावरकर स्मारकाने या माहितीपटाची निर्मिती केली आहे.
(हेही वाचाः स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आजच्या तरुणाईकडून काय अपेक्षा असत्या?)
या मान्यवरांची उपस्थिती
भगूर येथे होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कार्यवाह राजेंद्र वराडकर, शैलेंद्र चिखलकर, पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाचे नाशिक विभागाच्या सहाय्यक संचालक सौ. आरती आळे उपस्थित राहाणार आहेत. त्याचप्रमाणे भगूरच्या माजी नगराध्यक्षा सौ. अनिताताई विजय करंजकर, भगूरचे मुख्याधिकारी संजय केदार, प्रशासक दीपक पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय तथा अप्पा कारंजकर, विश्वहिंदू परिषदेचे प्रांत अध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष एकनाथराव शेटे (सर) यांचीही विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला आहे.
(हेही वाचाः पुण्यात वीर सावरकरांच्या १३९ व्या जयंतीनिमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन)
हा माहितीपट स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जन्मस्थळ असलेल्या भगूर वाड्यात येत्या २८ मे २०२२ पासून दररोज तेथे भेट देणाऱ्यांना पाहाता येणार आहे. दिवसातून या माहितीपटाचे नियमित शो तेथे प्रदर्शित केले जातील, अशी माहिती स्मारकाच्यावतीने देण्यात आली आहे.
Join Our WhatsApp Community