स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समाजक्रांतीची यशोगाथा

209

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आयुष्याची वेगवेगळी पर्व आहेत. आधी सशस्त्रक्रांती पर्व, मग अंदमानपर्व. नंतर रत्नागिरीतल्या समाजक्रांतीचे पर्व त्यानंतर हिंदूराष्ट्र क्रांतीपर्व! सशस्त्र क्रांती मध्ये सावरकर पूर्णता यशस्वी झाले नाहीत. त्यांना अटक झाल्यावर त्यांची अभिनव भारत ही संघटना विखुरली. मात्र सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती पूर्णतः यशस्वी झाली असे आपण आज नक्कीच म्हणू शकतो.

सावरकरांची रत्नागिरीतील समाजक्रांती आणि सन १९३७ नंतर हिंदु महासभेचे अध्यक्ष म्हणून घातलेला हिंदुराष्ट्र क्रांतीचा विचार आणि कार्य या दोन्ही परस्परांशी निगडित आहेत. हिंदू संघटन, हिंदू प्रबोधन, अखंड हिंदू राष्ट्रवाद याची पायाभरणी सावरकरांच्या रत्नागिरीतील समाजकार्यात आहे. अंदमानातून सुटुन आल्यानंतही रत्नागिरीतील तुरुंगात तब्बल सात कुलुपांच्या आत सावरकरांना कोंडले गेले होते. सावरकरांनी प्रसंग ओळखून दोन अटी मान्य करुन सुटका करुन घेतली. ही सुटका करुन घेण्याचे उद्दीष्ट नुसतेच तुरुंगात खितपत पडण्यापेक्षा बाहेर येऊन समाजकारणाच्या माध्यमातून देशसेवा करावी हाच होता.

या तेरा वर्षांच्या काळात सावरकरांनी हिंदु समाजाला पडलेल्या सात सामाजिक बेड्या मोडायचा संकल्प यशस्वीपणे पूर्ण केला. त्या सात बेड्या पुढील प्रकारच्या होत्या. १. देवदर्शनबंदी- (काही पुर्वास्पृश्य जातींना हिंदु असूनही देवळात देवदर्शनाला प्रवेश नाकारला जात होता) २. स्पर्शबंदी- म्हणजे काही जातीच्या व्यक्तींचा स्पर्श जरी झाला तरी विटाळ मानला जात असे ३. व्यवसायबंदी- म्हणजे विशिष्ट जातींनी विशिष्ट व्यवसायच करायचे अन्य व्यवसाय करायचे नाहीत आणि केले तर जाती बहिष्कृत होण्याची भीती ४. शुद्धीबंदी- म्हणजे परधर्मातील गेलेल्या व्यक्तींना पुन: किंवा नव्याने हिंदुधर्मात येण्यास बंदी ५. रोटीबंदी- म्हणजे अन्य धर्मियाच्या हातचे खाणे तर सोडाच पण हिंदु हिंदुंमधील अन्य जातीच्या हातचे खाल्ले तर जात बुडते असा समज, ६. बेटीबंदी- म्हणजे आंतरजातीय किंवा मिश्र विवाह करण्यास बंदी. याव्यतिरीक्त ७. सिंधुबंदी- म्हणजे समुद्र ओलांडून जायचे नाही गेल्यास धर्म बुडतो. हि बंदी अर्थात आधीच मोडली गेलेलीच होती. १९ आणि २० व्या शतकात हजारो भारतीयांनी समुद्रगमन करुन परदेशात प्रवास केला होता. स्वत: सावरकरांनीही ही बंदी मोडली होती व त्यासाठी त्यांना कोणतेही प्रायश्चित्त घ्यावे लागले नाही. अशा प्रकारे या सर्वच्या सात बेड्या सावरकरांनी मोडण्याचे यशस्वी प्रयत्न केले. हे प्रयत्न उक्ती आणि कृती अशा दोन्ही माध्यमातून करण्यात ते यशस्वी झाले. म्हणून ही सावरकरांच्या समाजक्रांतीची यशोगाथा आहे. स्वत: सावरकरांनीही एका प्रसंगी, माझी समुद्रातली उडी विसरलात तरी चालेल पण रत्नागिरीतले समाजकार्य विसरू नका असे सांगितले. कारण या बेड्या मोडूनच त्यांचे ‘इहवादी हिंदुराष्ट्र’अस्तित्वात येणार होते, येणार आहे. हे सर्व कार्य घडले त्यांच्या स्थानबद्धतेत. हिंदूसमाज एकसंघ/ एकजीव करण्याची त्यांची प्रयोगशाळा होती रत्नागिरी!

अशी सगळी पार्श्वभूमि असल्याने स्वा. सावरकरांच्या रत्नागिरीतील या यशोगाथेचा दृकश्राव्य पद्धतीने मागोवा घेऊन डिजिटल स्वरुपात संग्रहीत करावी अशी कल्पना मनात आली. काळाच्या ओघात अशी स्थाने नष्ट होऊ शकतात त्यात बदल होतात. तर आता जेवढे आहे त्याचे चित्रीकरण करुन पुढील पिढ्यांसाठी एक माहितीपट तयार करावा अशी कल्पना घोळत होती. स्वा. सावरकर स्मारकाचे सहकार्यवाह स्वप्नील सावरकर यांना मी ती बोलून दाखवल्यावर त्यांनी ताबडतोब उचलून धरली. ती त्यांनी स्मारकाच्या कार्यकारणीत मांडल्यावर अध्यक्ष प्रविण दीक्षित, कार्याध्यक्ष रणजीत सावरकर आणि कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांनी सहर्ष पाठिंबा दिला. अशा प्रकारे माहितीपटासाठी हिरवा कंदील मिळताच सावरकर स्मारकाचा आमचा सहा जणांचा चमू रत्नागिरीला दाखल झाला. माझ्यासोबत दृकश्राव्य माध्यमात काम करण्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले स्वप्नील सावरकर, उत्तम जनसंपर्क असलेले अनुभवी कार्यवाह राजेंद्र वराडकर, निवेदन-सूत्रसंचालक शार्दुल आपटे, कॅमेरामन सतीश गरुड आणि वाहनचालक निखिल कोचरेकर असे सगळेच जण उत्साही. सावरकरांच्या या यशोगाथेवर माहितीपट तयार करण्याच्या कल्पनेने भारावलेले!

सावरकरांचे रत्नागिरीतील कार्य तेरा वर्षांचे प्रदीर्घ आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातले. हे कार्य क्रांतीकारी असले तरी अतिशय अवघड आणि चिकाटीने करण्याचे. इथे सावरकरांना शस्त्रे आणि बॉम्ब अशा साधनांचा उपयोग नसून लोकांचे सातत्याने प्रबोधन, न कंटाळता चर्चासत्रे , भाषणे देऊन आणि लेख लिहून करण्याचे. इतकेच नव्हे तर ‘आधी केले मग सांगितले’ न्यायाने स्वत:ही आचरणात आणण्याचे हे कार्य. त्यामुळे हे सर्व जिल्ह्यातील प्रत्येक संबंधित ठिकाण एक तासाच्या माहितीपटात समाविष्ट करणे व्यावहारीक नव्हते. त्यामुळे जेथे जेथे ठळक कार्य घडले त्यातील प्रमुख स्थाने निवडणे आवश्यक होते ती पुढीलप्रमाणे निवडली.

अंदमानातून बाहेर आलेले सावरकर बंदिस्त होते ते रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृह, त्यानंतर सावरकर स्थानबद्धतेच्या अटीवर तब्बल तेरा वर्षे राहिले ते पटवर्धनांचे घर, तसेच काही महिने सावरकरांचे वास्तव्य होते ते शिरगाव येथील दामले यांचे घर, सावरकरांनी दर्शन बंदी मोडण्यासाठी सर्वप्रथम पूर्वास्पृश्यांना दर्शनासाठी मुक्त केले ते रत्नागिरीचे प्राचीन विठ्ठल मंदिर, रोटीबंदी मोडण्यासाठी जिथे सर्वप्रथम सहभोजन घडले ते शिरगावकर यांचे घर हिंदू, संघटन जातिभेद मोडणारे गुरव यांचे हनुमान मंदिर, सर्व हिंदूंसाठी गाभाऱ्यापर्यंत दर्शनासाठी खुले असावे या हेतूने निर्माण झालेले पतितपावन मंदिर, त्याच्याच आवारात अखिल हिंदू उपहारगृह जिथे रोटीबंदी पूर्णपणे मोडली गेली अशी वेगवेगळी ठिकाणे निश्चित केली गेली. बहुजन समाजातील आणि हिंदुमहासभेच्या कार्याचे महत्वपूर्ण प्रतिवृत्त छापणारे अच्युत मलुष्टे यांचे मिठाईचे दुकान आजही आहे. सावरकर त्यांच्या दुकानात बरेचदा सायंकाळी जाऊन बसत असत. त्या मलुष्टे यांचे नातू हे दुकान आजही चालवतात आणि सावरकरांच्या आठवणीही जपतात. अशी ठिकाणे निश्चित करुन तेथील व्यवस्था पाहणारे सावरकरप्रेमी, विश्वस्त किंवा त्याचे मालक यांच्याशी संपर्क साधून चित्रिकरणासाठी परवानगी घेतली. सर्वांनी आनंदाने मान्यता दिली आणि सर्व सहकार्य केले. रत्नागिरी विशेष कारागृहाचे सध्याचे तुरुंगाधिकारी अमेय पोतदार यांनी अतिशय बहुमोल माहिती आणि जुनी कागदपत्रे आमच्या सुपुर्त केली. पतितपावन मंदीराचे बाबा परुळेकर, सावरकरांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या शाळेत शिकलेले उमेश खंडकर यांनी आपला बहुमोल वेळ खर्च करुन सहकार्य दिले. सावरकर जिथे राहिले ते पटवर्धनांचे मूळ घर आता अस्तित्वात नाही. तिथे टोलेजंग इमारत उभी राहिली आहे. परंतु सुदैवाने त्याचे थोडेसे चित्रीकरण ज्येष्ठ गायिका श्रीमती शैला दातार, प्राची पटवर्धन- देवल यांच्याकडून प्राप्त झाले. रवींद्र गांगुर्डे यांच्याकडून घराचे जुने छायाचित्रही मिळाले. या सर्वांचेच विशेष आभार.

शिरगाव मधील दामले कुटुंबाचा उत्साह वाखाणण्यासारखा होता. सावरकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेली ही वास्तू त्यांनी शंभर वर्ष जशीच्या तशी जपली आहे, हि साधी गोष्ट नाही. सर्व कुटुंबाने उत्साहाने आमचे स्वागत आणि आदरातिथ्य केले. परंपरेने चालत आलेल्या सावरकरांसंबंधीच्या आठवणी आम्हाला सांगितल्या, त्यांच्या मुलाखती, बाईट्स चित्रीकरण करून घेतले.

रत्नागिरीतले पतितपावन मंदीर आता विख्यात आहे. तेथील सर्व माहिती परुळेकरांनी सविस्तर दिली. पतितपावन मंदीराच्या मानाने सावरकरांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती काहिशी दुर्लक्षित! सावरकरांनी परटवणे येथे सर्व जातीच्या हिंदुं विद्यार्थ्यांसाठी येथे शाळा सुरु केली. ती शाळा प्रथम खंडकर यांच्या घराला लागूनच असलेल्या प्राचीन भार्गवराम मंदीरात भरत असे. सर्व स्पृष्यास्पृश्य मुले समानतेच्या भावनेने या मंदीरात एकत्र बसवण्यास सुरुवात झाली आणि पुढे शेठ भागोजी किर यांच्या आर्थिक पाठबळाने मंदीरासमोरच मोठी शाळाही बांधण्यात आली. या शाळेला भेट देऊन तेथील चित्रिकरणही पूर्ण केले. या शाळेला सावरकरांचेच नाव रत्नागिरी नगर परिषदेने दिले आहे. परंतु पतितपावन मंदीराप्रमाणेच हि शाळा सुद्धा सावरकरांचे एक महत्वाचे स्मृतीस्थळ व्हावे अशी अपेक्षा आहे.

सहभोजनांच्या द्वारे, उपहारगृहाच्या माध्यमातून रोटीबंदी मोडणे, जुनी देवळे पुर्वास्पृश्यांना दर्शनासाठी मोकळी करण्यास प्रोत्साहन देणे, स्पर्शबंदी मोडण्यास सर्व जातीच्या हिंदुंचे एकत्रित कार्यक्रम घेणे, दसऱ्याच्या सोन्याची देवघेव, पुर्वास्पृश्य वस्तीत येणे जाणे, त्यांच्या घरी फराळ करणे, त्यांना आपल्या घरी बोलावणे, स्त्रियांमधील अस्पृश्यतेची भावना मोडण्यासाठी सर्व हिंदु जातीतील स्त्रियांचे हळदीकुंकु, गावकुसाबाहेर या शब्दाची सीमारेषा पुसुन टाकणे हे सर्व सावरकरांनी यशस्वीपणे केले. पुर्वास्पृश्यांना वाजंत्री किंवा पिंजारी असे परंपरागत नसलेले व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे इतकेच नव्हे तर त्यासाठी त्यांना कर्जे मिळवून देणे अशी कार्ये सावरकर करत होते. या काळात सावरकरांच्या प्रेरणेने आणि पाठबळाने आंतरजातीय मिश्र विवाह सुद्धा घडले अशी माहिती सावरकरांचे साम्यवादी अनुयायी ना. सं बापट यांनी दिली आहे. तुकोजी होळकर यांना धर्मांतर न करता मिस मिलर या अमेरिकन युवतीशी विवाह करण्याला सावरकरांनी व त्यांचे बंधु नारायण राव सावरकर यांनी पाठिंबा दिला आणि मिस मिलरलाच हिंदु करुन घेतले. बेटीबंदी मोडण्याचीच हे उदाहरणे होत. धाक्रस नावाच्या पुर्वी हिंदु असलेल्या नंतर ख्रिश्चन झालेल्या कुटुंबासही सावरकरांनी शुद्ध करुन घेत शुद्धीबंदीची बेडी प्रत्यक्ष कृतीतून मोडली. महर्षी वि. रा. शिंदे ते गाडगेबाबा असे अनेक सामाजिक नेते रत्नागिरीला भेट देत आणि सावरकरांच्या हिंदुसंघटनाच्या आणि जातीभेद निर्मुलनाच्या या यशाने विस्मयचकीत होत असत.

सावरकरांनी या काळात प्रखरपणे बुद्धीवाद देखिल मांडला. बाबा वाक्यम प्रमाणम किंवा केवळ पोथीनिष्ठा त्यांनी त्याज्य ठरवली. १९३५ मध्ये सावरकरांनी मनुस्मृतीवर काही चिकित्सक व्याख्याने दिली. ही व्याख्याने त्यांनी मालवणच्या दत्तमंदीरात आणि कन्याशाळेत दिली होती. मालवण मध्ये जाऊन या ठिकाणांचे चित्रीकरण पूर्ण केले. त्या घटनांचे साक्षिदार असलेल्या कुटुंबियांच्या वंशजांच्या आठवणीही चित्रीत करुन घेतल्या. मालवणातच सर्व पुर्वास्पृश्य समाजाचे अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशलात सर्व पूर्वास्पृश्य समाजाने प्रेमाने आणि विश्वासाने सावरकरांची अध्यक्ष म्हणून निवडही केली होती. अनेक महत्वाच्या सामाजिक नेत्यांनी या प्रसंगी अधिवेशनाला भेट दिली होती आणि सावरकरांच्या प्रत्यक्ष कार्याने आणि प्रेमळ निष्कपट वृत्तीने भारावूनही गेले होते. ही ठिकाणे आणि आठवणी या सावरकरांच्या समाजक्रांतीच्या इतिहासाच्या साक्षीदार आहेत. सावरकरांनी सनातन्यांचा त्याकाळातील बालेकिल्ला जो रत्नागिरी जिल्हा त्याला समाजक्रांतीचा सुरुंग लावला. लोकांच्या मानसिकतेत कधी प्रेमाने कधी कठोरपणे आणि बरेचदा प्रबोधनाने बदल घडवून आणला. सावरकरांच्या समाजक्रांतीचे या संबंधित ठळक स्थानांचे चित्रीकरण करुन ठेवणे, डिजिटल स्वरुपातही सुरक्षित करुन ठेवणे आवश्यक होते. नविन पिढ्यांना सावरकरांनी समाजक्रांती केलेली ही ठिकाणे कोणती ते प्रत्यक्ष दर्शन घेता यावे आणि त्यातून समाजकार्याची स्फूर्ती घेता यावी यासाठी हा माहितीपट यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे. माहितीपटाची, संकल्पना आणि सादरीकरण माझे असले तरी या माहितीपटाचे जे काही श्रेय आणि यश आहे ते आमच्या सर्व टीमचे तसेच रत्नागिरी मधील स्थानिक सावरकर प्रेमी मंडळींच्या सहकार्यांमुळे आहे. त्यांच्या विना हे काम पूर्ण होणेच शक्य नव्हते. दिनेश भातरे यांनी उत्तम प्रकारे संस्करण, विविध इफेक्ट्स वापरून माहितीपटाला अजूनच रंजक बनवले आहे. त्या सर्वांचे तसेच या माहितीपटाची निर्मिती केली त्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे आभार आणि अभिनंदन!
(लेखक वीर सावरकर अभ्यासक आणि इतिहासकार आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.