स्वातंत्र्यवीर सावरकर विज्ञाननिष्ठ ज्ञानपुरुष!

264

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अंदमानात ५० वर्षांची शिक्षा भोगावी लागली, तेव्हा त्यांना त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागली होती, वीर सावरकर यांना ‘ते राजकारणात सहभाग घेणार नाही’, अशी अट घालण्यात आली होती. १९२१ साली वीर सावरकर भारतात परतले, त्यावेळी त्यांना रत्नागिरीला ठेवण्यात आले. तेव्हा त्यांनी राष्ट्र आणि समाज उद्धारासाठी मोठ्या प्रमाणात लिखाण केले. त्या काळात त्यांनी सगळ्यात महत्वाचे कार्य हे सामाजिक क्रांतीचे केले. जर देशाला एकसंध ठेवायचे असेल तर भारतामध्ये राहणारे भारतावर श्रद्धा ठेवणारे सगळे हिंदू आहेत, हा विचार दृढ केला पाहिजे हे वीर सावरकर यांनी हेरले होते. वर्षानुवर्षे राज्य करणाऱ्या ब्रिटिशांना जर पराभूत कार्याचे असेल तर देशातील प्रत्येक व्यक्ती विज्ञाननिष्ठ बनली पाहिजे. भारतात राहणाऱ्या हिंदूंसह मुस्लिम, ख्रिश्चन यांनी त्यांच्या अंधश्रद्धा सोडून दिल्या पाहिजेत. मनुष्य जीवनास जे अनुकूल ते चांगले, जे प्रतिकूल असेल ते वाईट, असा जो नीती-अनीतीचा विचार आहे. जे मनुष्याला आवडते ते देवाला आवडते, या समजुती खुळचट आहेत, असे वीर सावरकर मानत. विश्वामध्ये आपण आहोत पण विश्व आपल्यासाठी नाही, फार कमी अंशी ते आपल्यासाठी अनुकूल आहे आणि फार मोठ्या अंशी ते प्रतिकूल आहे, अशा वेळी प्रतिकूल परिस्थितीला धाडसाने तोंड देणे हीच खरी माणुसकी आहे, असे सावरकर मानत असत. वीर सावरकर यांचा बुद्धीप्रामाण्यवाद आहे, तो त्यांनी वारंवार स्पष्ट केला आहे.

( हेही वाचा : वीर सावरकरांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार वीरतेचा भाव जपणाऱ्यांनाच मिळतो! देवेंद्र फडणवीसांचे गौरवोद्गार  )

वीर सावरकरांची अस्पृश्यविरोधी चळवळ

यासाठी वीर सावरकरांनी सात बेड्या तोडण्याचा प्रयत्न केला आहे. वेदोक्त बंदी, रोटी बंदी, व्यवसाय बंदी, बेटी बंदी, स्पर्श बंदी, शुद्धी बंदी, सिंधू बंदी या सात बेड्या हिंदूसह सर्व समाजाच्या लोकांच्या पायातील बेड्या होत्या. या सर्व बेड्या हिंदूंनी परकीय आक्रमणापासून हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी घालून दिल्या होत्या. हिंदूंचे हे गुण त्यांनी विवेक न बाळगल्यामुळे त्यांच्यासाठी दोष बनले आहेत. त्यामुळे भारतीयांनी विज्ञानयुग अंगिकारले पाहिजे, असे वीर सावरकर म्हणत असत. त्याचवेळी सावरकर हेही सांगतात की, हिंदूंसह अन्य धर्मियांचे धर्मग्रंथ हे त्रिकालाबाधित आणि अपरिवर्तनीय आहेत हे मानता कामा नये. वीर सावरकर यांच्या मते सर्व धर्मातील स्पर्श बंदी, अस्पृश्यता ही मनुष्यामध्ये विभाजन करणारी आहे. जोवर आपण सर्व जण एक आहोत, असा विचार येत नाही तोवर आपली शक्ती वाढणार नाही, हे त्यांनी जाणले होते. तेव्हा वीर सावरकर यांनी अस्पृश्यविरोधी चळवळ रत्नागिरीत शाळांमधून सुरू केली. तेव्हा शाळेत पूर्वास्पृश्यांच्या मुलांसोबत एकत्र बसवण्यास सुरूवात केली. वीर सावरकरांना स्पृश्यांकडून विरोध होऊ लागला. तुम्ही आमच्या भावना का दुखावता, अशी विचारणा ते करू लागले. तेव्हा वीर सावरकरांनी त्यांना उलट विचारले की, जर तुमच्या भावना दुखावतात तर तशा आमच्या मानवी धर्म बंधूंच्या भावना आहेत, त्या दुखावत नाहीत का? ज्या भावना अन्यायी आहेत, लोकहिताच्या विरोधात आहेत, त्या दुखावणे आवश्यकच आहे. त्याचा परिणाम म्हणून जेव्हा भारतीय राज्यघटना निर्माण झाली, त्यावेळी अस्पृश्यविरोधी कायदा झाला.

१९३० मध्ये केवळ वीर सावरकरांनी केले समाजप्रबोधनाचे कार्य

तेव्हा सावरकरांनी समुद्र प्रवासावरील बंदीवर आवाज उठवला होता. ही बंदी उठवणे कीती योग्य आहे, हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले होते. त्यासाठी त्यांनी मोपले आणि हलबी यांचे उदाहरण दिले. मोपले आणि हलबींची तेव्हा एक रुढी होती, जे समुद्र प्रवास करतील, त्यांना जाती बहिष्कृत करावे. त्यामुळे समुद्रीमार्गे होणारा परदेशी व्यापार आपण स्वत:हून परकीयांच्या ताब्यात दिला होता. मलबारच्या राजाने त्यावर उपाय म्हणून हिंदूंनी त्याच्या कुटुंबातील एक मुलगा मुसलमानांना देऊन टाकावा, अशी राजाज्ञा काढली. दुसरे उदाहरण हलबी राजपूत समाजाचे होते, त्यांच्यात बालविवाहाची पद्धत होती, तेव्हा लहानपणी नवऱ्याचा मृत्यू व्हायचा तेव्हा त्या कुमारिकांवर अत्याचार होत असे, त्यापासून मूल जन्माला यायचे ते जोवर मुसलमानांना दिले जात नाही तोवर विटाळ सुटणार नाही, अशी रूढी होती. या रूढी नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या रूढींविरुद्ध वीर सावरकरांनी प्रबोधन केले. त्यावेळी लोकमान्य टिळक, म. फुले नव्हते, तर म. गांधी राजकरणात व्यस्त होते. अशावेळी वीर सावरकर यांनी समाजसुधारणाचे काम केले. त्यावेळी त्यांनी भाषा शुद्धी, सैनिकीकरण, गो विचार, सामाजिक बंधुता, विज्ञाननिष्ठता, स्त्री सबलीकरण अशा अनेक विषयांवर त्यांनी जागरूकता आणली. वीर सावरकर यांनी १९२०-३० मध्ये लिहिलेले विचार आजही आपल्याला पटतात. अशा प्रकारे मग धर्मांतरीत झालेले मुसलमान आज मोपले मुसलमान म्हणून ओळखले जातात. वीर सावरकर यांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिरात अस्पृश्यांना थेट मंदिरात पुजारी म्हणून नेमले. अस्पृश्यांच्या सार्वजनिक पंगतीच्या पंगती उठवल्या. अशा प्रकारे वीर सावरकर हे श्रेष्ठ समाजसुधारक होते, त्यांच्या विचारांचे वाचन कथन, आत्मचिंतन केल्याने त्याचा वैयक्तिक व सामाजिक पातळीवर फायदा होईल.

(लेखक माजी पोलीस महासंचालक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.