आचार्य अत्रेंच्या दृष्टीकोनातून वीर सावरकर

1073

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा प्रभाव तत्कालीन नेत्यांवर व साहित्यिकांवर होता तसा आचार्य अत्रेंवरही होता. आपल्या सान्निध्यात आलेल्या लोकांना आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाने सावरकर भुरळ पाडत असत. त्यासाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यायची गरज नव्हती. देवळाजवळ आलेल्या प्रौढ भाविकालाच काय तर लहानग्या मुलाला देखील ‘पाया पड’ असे सांगायला लागत नाही. त्याचे हात आपसुक जोडले जातात. सावरकरांच्या बाबतीतही भेटायला येणाऱ्या लोकांचे तसेच होत होते. आचार्य अत्रेंनी सावरकरांवर प्रदीर्घ लेखन करुन ठेवलेले आहे. त्यातून त्यांची सावरकरांविषयीची भावना आपण समजून घेऊ शकतो. आचार्य अत्रेंसारखे साहित्यिक मराठी भाषेला लाभले हे आपले भाग्यच म्हणायचे. प्रचंड बुद्धिमत्ता, अभ्यास, उत्तम लेखन आणि मंत्रमुग्ध करणारी आणि विरोधकांना सळो की पळो करणारी वाणी म्हणजे आचार्य अत्रे.

( हेही वाचा : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आजच्या तरुणाईकडून काय अपेक्षा असत्या? )

अत्रे आणि सावरकरांची पहिली भेट रत्नागिरीत सावरकरांच्या घरी झाली. सावरकर निर्बंधमुक्त झाले त्या वेळेस अनंतराव गद्रे यांच्यासोबत ते रत्नागिरीला गेले होते. या भेटीचं वर्णन करताना अत्रे लिहितात, ‘त्यांचा सतेज गौरवर्ण आणि विलक्षण प्रभावी डोळे ह्यांचा माझ्या अंतःकरणावर जो परिणाम झाला, तो अद्यापही मी विसरलेलो नाही.’ १० ते १५ मिनिटे त्यांची भेट झाली असली तरी त्यांना भेटून अंतरात्मा तृप्त झाल्यासारखे वाटले असं अत्रे लिहितात.

आज आपण सावरकरांच्या नावापुढे स्वातंत्र्यवीर हे विशेषण लावतो. सावरकरांना अनेकांनी स्वातंत्र्यवीर म्हटलेले असले तरी जाहिर सभेत सावरकरांसमोर त्यांना ‘स्वातंत्र्यवीर’ म्हणणारे अत्रे होते. शिवाजी आखाड्यातील सत्कार सभेमध्ये त्यांनी ही उपाधी सावरकरांना बहाल केली होती. महत्वाचं म्हणजे अत्रे लिहितात की त्यावेळेस सावरकरांच्या अंगात पुष्कळ ताप होता तरीही त्यांनी दीड तास उत्स्फूर्त भाषण केलं. सावरकर कसे बोलायचे असा प्रश्न आपल्याला पडतो. अत्रेंनी यावर छान लिहून ठेवलंय. ‘लांब लांब उड्या मारीत जसा एखादा चित्ता जंगलातून धावतो, तशी एकामागून एक लांबलचक, प्रभावी वाक्ये झपाट्याने त्यांच्या मुखातून बाहेर पडत.’ अत्रे सावरकरांच्या सहवासात आल्यानंतर त्यांनी सावरकरांचे समग्र साहित्य आणि चरित्रविषयक ग्रंथ एका पंधरवड्याच्या आत वाचून काढले. अत्रे स्वतःच लिहितात की, ‘त्यांच्या सान्निध्यात येणाऱ्या माणसांना आपणासारखे तत्काळ करुन टाकण्याचे विलक्षण जबरदस्त सामर्थ्य सावरकरांच्या वाणीत आणि व्यक्तिमत्वात आहे.’ तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आचार्य अत्रेंनी सावरकरांसाठी मारामारी देखील केलेली आहे. पुण्यातील काही विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानपत्र देण्यासाठी ‘सार्वजनिक सभे’च्या दिवाणखान्यात एक सभा बोलवली. पण यास कॉंग्रेसमधील काही समाजवादी विद्यार्थ्यांचा विरोध होता आणि ह्या सभेत काहीतरी गोंधळ उडणार अशी बातमी आचार्य अत्रेंना समजल्यावर लगेच ते त्या ठिकाणी गेले. कॉंग्रेसच्या विद्यार्थ्यांनी अत्र्यांना विरोध केला. तरी अत्रे व्यासपीठावर अध्यक्षस्थानी असलेल्या ग. वि. केतकरांच्या खुर्चीवर जाऊन बसले. सभेला सुरुवात होण्याच्या आधी अचानक दिवे बंद केले गेले. आणि मग अंधाराचा फायदा घेत कॉंग्रेसच्या विद्यार्थ्यांनी अत्रेंवर हल्ला केला. अत्रेंनी हातानेच एकेकाला मागे ढकलले. त्यानंतर शिपायांनी अत्रेंना पकडून रस्त्यावर आणून सोडून दिलं. ही घटना दुसऱ्या दिवशी ‘ज्ञानप्रकाश’च्या अंकात प्रसिद्ध झालेली आहे.

आचार्य अत्रेंच्या मनात स्वा. सावरकरांविषयी एक वेगळा आदर निर्माण झालेला होता. सावरकरांच्या मनातही अत्रेंविषयी ममत्व होते. टिळक स्मारक मंदिरात ज्यावेळी पुण्यातल्या विद्यार्थ्यांनी सावरकरांना मानपत्र देण्याचे ठरवले होते, त्यावेळेस सावरकरांनी हट्ट धरला की आचार्य अत्रेंना तुम्ही इथे आणल्याशिवाय हे मानपत्र मी स्वीकारणार नाही. मग विद्यार्थ्यांनी अत्रेंना पकडून आणलं. अत्रे सभागृहात येताच टाळ्यांचा कडकडाट झाला, त्यांना पाहिल्यावर सावरकर उभे राहिले आणि त्यांनी अत्रेंना मिठी मारली. अत्रे या प्रसंगाविषयी लिहितात की, ‘माझ्या आयुष्यामधील अत्यंत अविस्मरणीय असा तो क्षण होता.’ १८५७ चे स्वातंत्र्यसमर या ग्रंथाविषयी व्यक्त होताना अत्रे लिहितात, ‘आजपर्यंत जगात एवढा ज्वालाग्राही ग्रंथ कोणाही लेखकाने लिहिला नसेल.’ या ग्रंथाला अत्रे ‘स्वतंत्र क्रांतीच्या तत्वज्ञानाची गीता’ म्हणतात. अत्रेंचं म्हणणंही खरंच आहे. या ग्रंथाचं लेखन केलं त्यावेळेस सावरकर अवघे २३-२४ वर्षांचे असतील. त्याकाळी ह्या ‘कालच्या पोराला’ घाबरुन ब्रिटिशांनी हा ग्रंथ प्रकाशित होण्याआधीच त्यावर बंदी घातली. भगतसिंहांपासून नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यापर्यंत हा ग्रंथ मस्तकी लावून क्रांतिकारकांनी या क्रांति होमात उडी घेतलेली आहे.

सावरकरांच्या वक्तृत्वाबद्दल अत्रेंनी दोन लेख लिहून ठेवले आहेत. सावरकर नि त्यांचे वक्तृत्व भाग १ नि २. त्यातील पहिल्या भागात ते लिहितात, ‘गाण्याच्या मैफिलीत रंगणारे रसिक असे सांगतात की, खऱ्या अर्थाने रंगलेली बैठक जेव्हा समाप्त होते तेव्हा गाणारा गवई नि ऐकणारे श्रोते ह्यांची अशी काही लय लागते की, बैठक संपल्यानंतरही बराच वेळ त्या गाण्याचे पडसाद श्रोत्यांच्या अंतःकरणात घुमत राहतात. सावरकरांच्या उत्कृष्ट व्याख्यानाच्या शेवटी हीच स्थिती होत असे.’ केवढाही मोठा समाज असो, त्याला नागाप्रमाणे डोलायला लावण्याची किमया सावरकरांच्या वक्तृत्वात होती असं अत्रे म्हणतात. यावरुन सावरकरांचे वक्तृत्व देखील त्यांच्या व्यक्तिमत्वाइतकेच उत्तुंग होते याचा प्रत्यय आपल्याला येतो. सावरकरांनी आपल्या वत्कृत्वाच्या असामान्य सामर्थ्यावर सारा महाराष्ट्र आपल्या मागे उभा केला असं अत्रेंना वाटतं. याही पुढे जाऊन ते म्हणतात, ‘गंगेचे पाणी नि सावरकरांची वाणी ह्यांची तुलना विशालतेत, वेगात नि पावित्र्यात यथार्थपणे करता येईल.’ अत्रेंना वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्वातंत्र्यवीरांची जी परंपरा महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे, त्या परंपरेमध्ये सावरकर एखाद्या कोहिनूर हिऱ्यासारखे चमकत राहतील. अत्रे लिहितात, मराठी भाषेत आधुनिक काळात कवी पुष्कळच होऊन गेले. पण देशभक्तीने आणि स्वातंत्र्यप्रेमाने ओथंबलेले महाकाव्य फक्त सावकरांनीच लिहिलेले आहे. मुंबईतील कॅडल रोडचे स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग असे नामकरण करण्यात आले तेव्हा आचार्य अत्रेंनी महापौरांचे अभिनंदन केलेले आहे. ‘सावरकर – मार्ग’ असा लेख त्यांनी लिहिलेला आहे. स्वा. सावरकरांच्या या त्यागाची जाणीव आचार्य अत्रेंना आहे. ते लिहितात, ‘देशाच्या स्वातंत्र्याखेरीज उभ्या आयुष्यात ज्यांनी दुसऱ्या कोणत्याही गोष्टीचा विचार केला नाही, स्वातंत्र्यलक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी ज्याने मरणाचे हालहाल पचविले, त्या भारताच्या आद्य क्रांतिकारकांच्या कुलपुरुषाला – त्या मृत्युंजय सावरकरांच्या चरणी आमची अनंत लोटांगणे असोत!’ ज्या प्रमाणे सावरकरांचा प्रभाव आचार्य अत्रेंवर पडला तसा अनेक बड्या नेत्यांवर पडलेला आहे. आज आपला भारत देश शिवाजी-सावरकर हा मंत्र निरंतर जपत आहे, हे चित्र खरेच सुखावह आहे. या मंत्राचा जप असाच निरंतर सुरु राहिला तर तो दिवस दूर नाही, जेव्हा भारत महासत्ता होईल नि पूर्वाश्रमीची महासत्ता आपल्या शब्दाच्या बाहेर जाण्यास धजावणार नाही. आजही विरोधक सावरकरांवर टिका करतात, द्वेष करतात. परंतु मला असे वाटते की, विरोधकांची दूषणे सावरकरांसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वापर्यंत पोहोचूच शकत नाहीत कारण सावरकरांच्या भोवती सकारात्मकतेचं एक वलय निर्माण झालेलं आहे आणि विरोधकांनी भिरकावलेले दगड त्यांच्या चरणांपाशी फुले बनून पडतात, इतके सावरकर महान आहेत. आज देश सावरकर तत्वावर चालतोय यापेक्षा वेगळे उदाहरण ते काय देऊ?

(लेखक व्याख्याते आहेत.)
(प्रमुख संदर्भ: क्रांतिकारकांचे कुलपुरुष: सावरकर – आचार्य अत्रे)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.