स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या 139 व्या जयंतीनिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक दादर येथे उत्साहाचे वातावरण होते. तरुण पिढीने वीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेत, त्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त यंदा स्मारकाला भेट देणा-यांमध्ये युवा पिढीची संख्या अधिक होती. वीर सावरकरांच्या राष्ट्रभक्तीने प्रेरित असल्याचे युवा वर्गाने यावेळी सांगितले.
वीर सावरकरांच्या कार्याची दिली माहिती
स्मारकाला भेट देण्यासाठी काही पालकही आपल्या मुलांना घेऊन आले होते. त्यावेळी वीर सावरकरांची प्रखर राष्ट्रभक्ती तसेच, वीर सावरकरांचे विचार त्यांचे देशाप्रती कार्य याची माहिती पालकांनी आपल्या मुलांना दिली. वीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतल्यानंतर, अनेकांनी वीर सावरकरांची पुस्तकेही पाहिली. यावेळी युवा पिढी राष्ट्रभक्तीने भारावली होती.
( हेही वाचा: स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या १३९व्या जयंतीनिमित्त भगूर येथे नेत्रदिपक सोहळा संपन्न )
वीर सावरकरांचे गुण अंगी बाणावेत
वीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त दर्शनासाठी आलेल्या तरुण पिढीमध्ये एकाचा वाढदिवस होता. वीर सावरकरांच्या जयंतीदिनीच वाढदिवस असल्याने, त्याने वीर सावरकरांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले. मी कायद्याचा विद्यार्थी आहे. त्यामुळे वीर सावरकरांसारखी अन्यायाविरुद्ध लढण्याची हिंमत, त्यांच्यातील सहनशीलता अंगी बाणावी यासाठी आज येथे आल्याचे त्याने सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार तरुण पिढीसाठी आदर्श आहेत, असे तो म्हणाला.