स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आजच्या तरुणाईकडून काय अपेक्षा असत्या?

218

अमर होय ती वंशलता।
निर्वंश जिचा देशा करिता।
दिगंती पसरे सुगंधिता।
लोकहित परिमलाची।।

स्वा. सावरकरांनी साहित्यातील नवरसांमध्ये आणखी एक रस जोडला आहे, देशभक्तीचा… त्यांची प्रत्येक कृती, त्यांचं प्रत्येक कार्य हे देशाला अर्पण केलेलं होतं. सावरकर लिहितात,

हे मातृभूमि तुजला मन वाहियेले।
वक्तृत्व वाक्-विभव ही तुज अर्पियेले।।
तुंतेंची अर्पिली नवी कविता रसाला।
लेखां प्रति विषय तूची अनन्य झाला।।

माझे मृत्यूपत्र या कवितेतील ह्या ओळी आहेत. अगदी तरुणपणी कारागृहात लिहिलेली ही कविता. तरुणपणीचे सावरकर देशभक्तीने ओतप्रोत होते. अर्थात सावरकरांचं सबंध जीवन देशभक्तीने भरुन गेलेलं होतं. आज जर सावरकर असते तर त्यांनी तरुणांकडून काय अपेक्षा केल्या असत्या हे जाणून घेण्यासाठी सावरकरांनी तरुणपणी काय केलं हे आपल्या समजून घ्यावं लागेल. वयाच्या साधारण १५ व्या वर्षी सावरकरांनी अष्टभुजा देवीसमोर प्रतीज्ञा घेतली, ‘मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत मिळवण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारुन मारिता मारिता मरेतो झुंजेन.’ ही १५ वर्षांच्या सावरकरांची मानसिकता आहे. याची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वरासमोर घेतलेल्या स्वराज्याच्या प्रतीज्ञेशी करता येईल. महत्वाचं म्हणजे या दोन्ही महापुरुषांनी आपली प्रतीज्ञा खरी करुन दाखवलेली आहे. महाभारतातल्या भीष्म प्रतीज्ञेपेक्षाही या दोन्ही महापुरुषांची प्रतीज्ञा महत्वाची ठरते कारण त्यांनी घेतलेली प्रतीज्ञा स्वतःच्या कुटुंबापुरती किंवा सिंहासनापुरती मर्यादित नव्हती. तर त्यात व्यापक हेतू होता, स्वराज्य…

ज्यावेळी सावरकरांना ५० वर्षांची दोन जन्मठेपेची शिक्षा झाली, त्यावेळेस त्यांची पत्नी त्यांना भेटायला आली होती. त्यावेळेस सावरकर आपल्या पत्नीला म्हणाले, ‘मुला-मुलींची वीण वाढवणं आणि चार काटक्या एकत्र करून घरटी बांधणे यालाच संसार म्हणायचे असेल तर, असले संसार कावळे-चिमण्याही करीतच आहेत. पण संसाराचा याहून भव्यतर अर्थ घेणे असेल तर आपण आपली चार चूलबोळकी फोडून टाकली. पण त्यायोगे पुढेमागे हजारो जणांच्या घरी सोन्याचाही धूर निघेल.’ कदाचित यापुढे आपण आपल्या पत्नीला परत भेटणार नाही, कदाचित यापुढे आपण भारतात पायही ठेवू शकणार नाही हे भयाण सत्य समोर असताना देखील ते पत्नीला समजवतात की आपण आपली चूल फोडल्यामुळे भविष्यात लोकांच्या घरातून सोन्याचा धूर निघू शकतो. दोन जन्मठेपेची शिक्षा झाली असताना त्यांच्या मनात प्रश्न उभा राहिला की आपण आता पकडले गेलो आहोत. मग आपल्या भारताला स्वतंत्र कोण करेल. वाचकांनो, एक भयावह शिक्षा झाली असताना त्यांना काळजी फक्त आणि फक्त भारतमातेची होती. मग त्यांना आपला दिव्य आणि भव्य इतिहास आठवतो. ते लिहितात,

सारथी जिचा अभिमानी
कृष्णजी आणी।
राम सेनानी।।
अशि तीस कोटी तव सेना,
ती अम्हांविना थांबेना।

अंदमान जवळ आल्यावर त्यांच्या मनात पहिला विचार येतो की, ‘अंदमानास भारतीय नौदलाचे पूर्वेकडील महाद्वार केले पाहिजे. कलकत्ता आणि मद्रास येथे समुद्रमार्गे स्वारी करण्यापूर्वी शत्रूला प्रथम अंदमानात अडविले जाईल आणि तेथेच त्याचा करता येईल तितका शक्तिपात करता येईल.’ हे तरुण सावरकर आहेत.

तरूणाईकडून सावरकरांच्या काय अपेक्षा असत्या हे जाणून घेण्यासाठी आपल्याला १९०० नंतरचा भारत अभ्यासावा लागणार आहे. जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदर्श होते, तोपर्यंत भारताने इंग्रजांसमोर गुडघे टेकलेले नव्हते. जेव्हा शिवाजी महाराज तत्कालीन नेत्यांना वाट चुकलेले देशभक्त वाटू लागले तेव्हा मात्र भारताची स्वातंत्र्यचळवळ भरकटली आणि फलस्वरुप फाळणी वाट्याला आली. या देशात आजही दोन प्रकारचा विचारप्रवाह राहतो. ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज हवे आहेत आणि ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज नकोत. सावरकरांचं सबंध जीवन, राजकारण, समाजकारण हे शिवरायांना समोर ठेवून केलेलं आहे. सावरकरांना इतका विरोध का होतो कारण त्यांनी खरे शिवाजी महाराज लोकांसमोर मांडले. शिव-विचाराच्या पालखीचे ते सर्वसामान्य भोई नसून व्यवस्थापक होते. शेवटपर्यंत ही पालखी त्यांनी आपल्या खांद्यावर वाहिली होती आणि मग जाताना त्यांच्या अनुयायांना त्यांनी सोपवली.

तरुणांनी या शिव-विचारांच्या पालखीचे व्यवस्थापन करावे आणि असे कोट्यवधी ‘पालखीचे-भोई’ निर्माण करावेत असं सावरकरांना वाटतं. सावरकर हे आशावादी असले तरी ते प्रॅक्टिकल होते. कुणीतरी एक दिवस सिंधू नदीला मुक्त करेल ही वेडी आशा नाही. आजपासून २५ वर्षांनी जागतिक राजकारणाची काय स्थिती असेल कुणाला माहिती आहे आणि कदाचित ती स्थिती सिंधू नदी परत मिळवण्यास पुष्ट असेल तर सावरकरांची ही इच्छा देखील पूर्ण होईल. आज आयोध्येत राम मंदिर निर्माण होतंय, काश्मीरमधून ३७०, ३५ए काढण्यात आलं, ट्रीपल तलाक या कायद्यांतर्गत मुस्लिम भगीनींना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे टाकलं, हे सर्व सावरकरांना हवं होतं तसंच घडतंय. शिवाजी महाराजांना देखील काशीचं मंदिर मुक्त व्हायला हवं होतं. ही इच्छा देखील लवकर पूर्ण होणार असल्याची चिन्हे सध्या आहेत. सावरकर म्हणतात, ‘ख्रिस्ताप्रमाणे क्रूस आपल्या वाट्याला येईल असे मनात धरुन देणग्यांची, सन्मानांची आशा न धरता, आयुष्याचे जे ठरले असेल ते ध्येय गाठता गाठता, कर्तव्य करीत करीत मरण पत्करण्यास सिद्ध रहा.’ हा सावरकरांचा संदेश आजच्या तरुणांनी आपल्या मनावर कोरुन ठेवला पाहिजे.

सावरकरांच्या चरित्राचा अभ्यास केल्यावर आपल्या लक्षात येतं की, प्राप्त परिस्थितीत त्यांना जे जे करता येणं शक्य होतं, ते ते त्यांनी केलेलं आहे. अंदमानमध्ये असताना देखील त्यांनी अभूतपूर्व क्रांती घडवून आणलेली आहे. हिंदूंना त्यांनी साक्षर केलं, धर्मांतर रोखले, अंदमानात २००० पुस्तकांचं संग्राहलय उभं केलं, काव्ये रचली… रत्नागिरीत स्थानबद्धतेत असताना पुर्वास्पृश्य निवारण करुन महाक्रांती घडवून आणली.

जर आज सावरकर असते तर त्यांनी तरुणांकडून कृतीशील वर्तणुकीची इच्छा बाळगली असती. ‘लेखण्या मोडा आणि बंदुका हातात घ्या’ म्हणजे सैन्यात भरती व्हा असं तरुणांना त्या काळी सावरकरांनी सांगितलं होतं. आज तासंतास मोबाईलमध्ये गुंतलेल्या तरुणाईला सावरकरांनी लेखणी हातात घ्यायला सांगितली असती. म्हणजेच त्याच्या हातात जो मोबाईल आहे, त्याचा वापर हिंदू संघटन आणि राष्ट्राला उन्नतीकडे नेण्यासाठी कसा करता येईल हे सावरकरांनी सांगितलं असतं. त्याकाळच्या तरुणाईला उद्देशून सावरकर म्हणाले होते, ‘इतिहास करणे हे आपल्या पिढीचं काम आहे इतिहास लिहिणे हे दुय्यम; ते पुढील पिढी क्वचित करेल.’ म्हणजे आता आपल्याला इतिहास लिहायचा आहे. छत्रपती शिवरायांचा इतिहास दूषित करुन सांगण्याचं काम काही कपटी लोक करत आहेत. आजच्या तरुणांनी योग्य तो इतिहास भारतवासियांपुढे मांडला पाहिजे. आपला इतिहास खूप महत्वाचा असतो. भूतकाळात काय जगायचं? असा सल्ला काही लोक देत असले तरी इतिहासातून प्रेरणा घेऊन तत्कालीन पिढी इतिहास घडवत असते हे विसरुन चालणार नाही. सावरकर प्रभृती क्रांतिकारकांसमोर शिवरायांचा दैदिप्यमान इतिहास होता. आपल्यासमोर शिवराय व सावरकरांचा इतिहास आहे.

आपण तरुण शिवाजी महाराजांच्या व सावरकरांच्या चरित्राचं ठिकठिकाणी पारायण करुन देशात सकारात्मक वातावरण निर्माण करु शकतो. ठिकठिकाणी मित्रमेळा भरवून देशाचं वातावरण सकारात्मक राहिल व ते शिवरायांच्या विचारांवर चालत राहिल हे सुनिश्चित करु शकतो. या मित्रमेळ्यात देशभक्ती गीते, राष्ट्रास पुष्ट असेल अशा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमातून आपण हे इप्सित साधू शकतो. आपण जे पोटापाण्यासाठी काम करतो, त्या कामामुळे आपण राष्ट्राच्या प्रगतीत हातभार लावतोय अशी धारणा आपण ठेवली पाहिजे. लक्षात घ्या, आता देश स्वतंत्र झाला असल्यामुळे आपल्याला हुतात्मा व्हायचं नसून, या मर्त्य शरीरात ज्या कारणासाठी आपला आत्मा आहे, ते कारण साध्य केलं पाहिजे. गृहस्थाश्रमात राहून, कुटुंबाचं उत्तम पालनपोषण करुनही राष्ट्रकार्ये करतात येतात, हे लक्षात ठेवायला हवं. लोकशाही व बाबासाहेब आंबेडकरांच्या संवैधानिक मार्गाने दुर्जनांचा नायनाट करण्यासाठी आपण सज्जनांचं संघटन केलं पाहिजे. सावरकरांना तरुणांकडून पुष्कळ अपेक्षा आहेत. लक्षात ठेवा आज कदाचित एकटा माणूस शिवराय होऊ शकत नाही. पण १००० जण मिळून आपण एका शिवरायांइतकं काम नक्कीचं करु शकतो. हे राष्ट्र शिवतत्वावर चालेल याची काळजी आजच्या तरूणाने घेतली पाहिजे म्हणजे या देशाचं भावविश्व हिंदू राहिलं पाहिजे. कारण शिवरायांच्या स्वराज्यात सगळेच सुखी होते. ‘राष्ट्रीय कार्य अविरत करणे हीही ईश्वराची प्रार्थनाच आहे, संध्याच आहे, निमाजच आहे.’ असं सावरकर म्हणतात.
आता सावरकराचं पुढील वाक्य आपण आपल्या मनावर कोरुन ठेवलं पाहिजे म्हणजे सावरकरांची तरुणांकडून नेमकी काय अपेक्षा होती किंबहुना आज जर सावरकर असते तर सावरकरांनी आजच्या तरुणाईकडून काय अपेक्षा ठेवली असती हे आपल्याला स्पष्ट होईल. सावरकर म्हणतात, “आपण हल्ली जसे महाराणा प्रतापसिंह, राणा भीमदेव, बाजीप्रभू, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या कृतीवर नाटके लिहितो. त्याप्रमाणे पुढील पिढीच्या नाटककारांना विषयीभूत होतील अशा कृती सध्याच्या तरुणांनी केल्या पाहिजेत.” हा सावरकरांचा आजच्या तरूणाईला संदेश आहे. हे काम खूप कठीण आहे. पण आपल्याला हे व्रत घेतलंच पाहिजे. सावरकरांच्याच शब्दात सांगायचं झालं तर,

की घेतले न हे व्रत अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने ।
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे ।
बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।

(लेखक व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.