आज वीर सावरकरांचे परराष्ट्र धोरण काय असते?

124

स्वातंत्र्यवीर सावरकर ह्यांचा उल्लेख झाल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला आठवते ती त्यांची त्रिखंडात गाजलेली मार्सेल्स बंदरातील उडी आणि त्यांनी भोगलेली अंदमान येथील जन्मठेप! ही सर्व कार्ये तर महान आहेतच, परंतु सावरकर हा विषय ह्यांच्या पलीकडे देखील खूप विस्तृत आहे. त्यात हिंदुत्वाची तात्विक मांडणी, राष्ट्रहिताचा इतिहास, भाषाशुद्धी, देशाची संरक्षण सिद्धता, तसेच स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण असे अनेक विषय आणि त्यांचा सखोल अभ्यास व त्यावर सावरकरांनी केलेले विस्तृत विवेचन हा भाग येतो. त्यातील सावरकरांना अभिप्रेत असलेले भारताचे परराष्ट्र धोरण ह्या विषयावर आपण काही चिंतन केले पाहिजे.

आपला देश, त्याची परिस्थिती आणि आपले शेजारी देश हा विषय खूप आधीपासून सावरकरांच्या अभ्यासाचा होता. १९०९ साली, जेंव्हा भारत परतंत्र होता, त्यावेळेस सावरकर ह्यांनी स्थापन केलेल्या ‘अभिनव भारत’ ह्या क्रांतिकरकांच्या संघटनेचे ‘तलवार’ ह्या नावाचे एक मुखपत्र होते. त्याच्या पहिल्या अंकात एका लेखात सावरकर ह्यांनी असे म्हटले होते की, ‘येत्या ४-५ वर्षांत युरोपात एक मोठे युद्ध होण्याची पुरेपूर शक्यता आहे. कारण जर्मनी आपल्या सैन्याची संख्या आणि शक्ती वाढवत चालला आहे. असे जर युद्ध झाले तर ते ब्रिटिश राष्ट्राला खूप महागात पडेल आणि त्या काळामध्ये ब्रिटिशांच्या अडचणीचा वापर करून, आपल्याला संपूर्ण तयारी करून आपले स्वातंत्र्य मिळवणे शक्य होईल. त्या युद्धाच्या वेळेस ब्रिटिश आपले हिन्दी सैन्य वापरतील आणि आपण ह्या संधीचा फायदा घेऊन उठाव करायला हवा. त्यासाठी आत्तापासूनच ब्रिटीस सैन्यातील भारतीय जवानांच्या मनात राष्ट्रप्रेम आणि ब्रिटिश सरकारविरुद्ध रोष निर्माण केला पाहिजे!’ त्यावेळेस सावरकर अवघे २५ वर्षांचे होते. पण त्यावेळेसदेखील त्यांचा जागतिक इतिहास, भूगोल तसेच जगातील विविध सत्ता आणि त्यांचा सत्ता समतोल ह्या बद्दलचा परिपूर्ण अभ्यास होता. त्याच्या जोरावरच त्यांनी पहिल्या महायुद्धाचे अचूक भाकीत केले होते! दोन्ही महायुद्ध दरम्यानच्या परिस्थितीचा भारताला त्वरित स्वातंत्र्य मिळण्याच्या दृष्टीने भरपूर उपयोग करून घेण्याचा त्यांचा सदैव आग्रह होता.

पुढे जन्मठेपेनिमित्त अंदमानला कैदेत असताना सुद्धा त्यांचे देशाच्या सुरक्षेसंबंधीचे चिंतन सतत चालूच होते. अंदमान निकोबार तसेच श्रीलंका, मालदीव आणि लक्षद्वीप ही बेटे, भारताच्या सागरी सुरक्षेचे पहारेकरी बनतील आणि त्यासाठी तेथे सुसज्ज आणि सशस्त्र नौसेनिक आणि वैमानिक तळ उभारायला पाहिजेत. हा विचार त्यांनी तेंव्हापासून करून ठेवला होता! ते किती महान द्रष्टे होते याचाच प्रत्यय म्हणजे, आता त्यापैकी अंदमानला मोठा सागरी तळ उभारून झालेला आहे. लक्षद्वीप येथेही अशा एका नाविक तळाची उभारणी सध्या चालू आहे.

दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेला ब्रिटीशांना भारतातून मोठे सैन्य उभारणे आवश्यक झाले होते. त्या सैन्य उभारणीचा कॉँग्रेस पक्षाने कडाडून विरोध केला होता! कॉँग्रेस नेत्यांची संरक्षण विषयक दृष्टी तेंव्हा पासूनच अतिशय अधू होती! सावरकर ह्यांनी मात्र ही चालून आलेली संधी अचूक ओळखली आणि त्यांनी सैन्यभरतीसाठी आटोकाट प्रयत्न केले. ‘प्रथम बंदूका वापरायला शिकून घ्या. नंतर त्या कोणावर रोखायच्या हे ठरवतता येईल!’ हे त्यांचे रोखठोक विधान होते. सावरकरांच्या ह्या अथक प्रयासामुळे भारतीय सैन्यातील हिंदूंची संख्या जवळ जवळ ७० टक्क्यापर्यंत पोहचली, जी आधी ४० टक्क्यांच्या जवळपास होती. ह्या हिंदूंच्या सैनिकभरतीच्या प्रयत्नांना मुस्लिम लीगने सातत्याने विरोध केलेला होता. स्वतंत्र भारताच्या वेळेस जर सैन्यात ही हिंदूंची बहुसंख्या नसती तर भारत स्वतंत्र झाल्याझाल्या पाकिस्तानच्या आक्रमणात केवळ काश्मीरचा एक भूभागच नव्हे, तर राजस्थान, पंजाब आणि बंगाल प्रांतात देखील पाकिस्तानने आपले लचके तोडले असते! आपण एक स्वतंत्र आणि सुरक्षित देश म्हणून जगू शकलो त्याला सावरकरांचे हे अथक प्रयत्न कारणीभूत आहेत, हे आपण नेहमी लक्षात घेतले पाहिजे.

सावरकरांच्या भूराजनैतिक आकलना मुळेच (Geopolitical knowledge), त्यांनी २२ जून १९४० रोजी सुभाषचंद्रांच्या भेटी दारम्यान त्यांना असा सल्ला दिला ‘आता तुम्ही भारताबाहेर पळून जाऊन इंग्लंडच्या शत्रू, जर्मनी आणि जपान ह्यांच्याशी माइरी जोडा आणि आपल्या हिन्दी सैनिक आणि युद्धकैद्यांच्या सहकार्याने स्वतंत्र भारताची पाहिली फौज उभारा!’ त्यानंतर अवघ्या सहाच महिन्यात सुभाषबाबू भारतातून निसटून जर्मनीला गेले आणि पुढे जपानला जाऊन त्यांनी राशबिहारी बोस ह्यांच्याबरोबर ‘आझाद हिंद सेनेची’ स्थापना केली. पुढे एकदा ब्रिटिश पंतप्रधान क्लेमॅन्ट अॅटली भारतात आले असताना, त्यांना विचारण्यात आले होते की, ‘तुम्ही भारताला स्वातंत्र्य देण्याचा निर्णय कशामुळे घेतला, ‘छोडो भारत’ चळवळीमुळे?” त्यावर हसून ते उत्तरले की ‘त्या चळवळीचा आमच्या निर्णयावर नगण्य परिणाम झाला!’ आम्हाला ‘आझाद हिंद फौजेच्या शक्तीची धास्ती वाटली, आणि आमच्या लक्षात आले की, जर उरलेली ब्रिटिश/ भारतीय फौज त्यांना सामील झाली तर आम्हाला भारतावर सत्ता राखणे अशक्य होऊन बसेल!’ सावरकरांचे निदान आणि त्यांनी सुचविलेला सैन्यभरतीचा मार्ग किती अचूक होता हे ह्यावरून दिसेल!
हे सर्व पाहता एक लक्षात येते की सावरकर प्रणीत विदेशनीतीमध्ये सर्वात महत्व आहे ते राष्ट्राच्या सामरिक शक्तीला! राष्ट्र प्रथम शक्तिशाली करण्यावर त्यांचा मुख्य भर होता. कुटनीतीत, तत्वे, सुविचार, न्यायनीतीची तत्वे ह्या सर्वांना काहीही स्थान असले तरी ती सर्व दुर्बलांच्या काहीच कामास येत नाहीत. देश स्वतंत्र झाल्यावर, आपल्या सैन्याचे आधुनिकीकरण हा सावरकर ह्यांच्या विचाराचा मुख्य धागा दिसून येतो. नेहरू ह्यांचा ‘मित्रदेश’ चीन ह्याने १९५० मध्ये तिबेट गिळंकृत केला, त्यावर सावरकर ह्यांनी खूप कटू प्रतिक्रिया दिली होती. त्यांच्या परराष्ट्र धोरणाचे एक मुख्य तत्व म्हणजे कुठलाही देश हा आपला कायमचाच मित्र अथवा शत्रू नसतो. ही परिमाणे बदलत असतात. कायम असते ते फक्त राष्ट्रहित! भारत सरकारच्या परराष्ट्र नीती मध्ये भारताच्या लाभाचाच विचार झाला पाहिजे. आपल मित्र चीन आहे हा विचार नव्हे! त्यानंतरदेखील २६ जून १९५४ रोजी चौ एन लाय हे चिनी पंतप्रधान, नेहरू ह्यांच्या भेटीस दिल्लीला आले होते. त्या वेळेस नेहरू ह्यांनी ‘हिन्दी चिनी भाई भाई’ ही घोषणा तयार केली. त्या वेळेस ४ जुलै १९५४ रोजी केसरी मध्ये सावरकर ह्यांनी एक मुलाखती दरम्यान पुनः ह्या मुद्याचा पुनरुच्चार केला आणि आपली सैनिकी शक्ती सुदृढ नसल्याने आपण चीनचा प्रतिकार करू शकलो नाही हे देखील सांगितले.

विश्वशांती वगैरे उच्च ध्येये आपल्या जागी छानच असतात पण राष्ट्रहिताचा बळी देऊन नव्हे! ह्या नंतरदेखील नेहरूंच्या डोळ्यावरची विश्व नेतृत्वाची धुंदी उतरली नाही, व त्यांनी सावरकरांच्या सूचनांचा काहीही विचार केला नाही उलट त्यांचे लाडके मंत्री व्ही के कृष्ण मेनन ह्यांच्या सल्ल्यानुसार आपले परराष्ट्र धोरण आखत राहिले. परिणामी १९६२ साली चीनने आक्रमण करून आपला अतिशय लाजिरवाणा पराभव केला. हे शल्य आपल्या सर्व देशवासीयांप्रमाणेच सावरकर ह्यांना देखील खूपच लागले. सावरकर जर परराष्ट्र नीती आखत असते तर अशी वेळ कधीच आली नसती! त्यांनी सर्वप्रथम चीन बरोबरच्या आपल्या सीमा निश्चित करून घेतल्या असत्या, जे ते १९४७ पासून सांगत होते! त्याबरोबरच त्यांनी आपली सैन्यदलास आधुनिक आणि सशक्त सैन्यदल बनवले असते. जे काम नेहरू ह्यांनी कधीच केले नाही. भारताला आण्विक महाशक्ती बनविण्यासाठी देखील सावरकर ह्यांनी अथक प्रयत्न केले असते. एके ठिकाणी त्यांनी म्हटले आहे की ‘मला देखील विश्वशांतीची आस आहे. जर सर्व जगाने अण्वस्त्रे त्यागली तर मी देखील भारतासाठी अशी भयंकर अस्त्रे बनविणार नाही, पण जोपर्यंत इतर देश ही अस्त्रे बनवणे सोडत नाहीत, तोपर्यंत माझ्या देशाकडेही अशी अत्याधुनिक अस्त्रे असलीच पाहजे. माझ्या देश कुठल्याही तऱ्हेने दुर्बल राहता कामा नये. दुर्बलांच्या उपदेशाला, किंवा नीतियुक्त वागण्याला जगाच्या बाजारात काहीही किंमत नसते हे एक वैश्विक सत्य आहे!’ जे नेहरू ह्यांना कधीच उमजले नाही. आपला देश शस्त्रास्त्रांच्या निर्मितीबाबत देखील स्वयंपूर्ण असला पाहिजे, हे देखील मत सावरकर अतिशय आग्रहाने मांडत असत. कारण परराष्ट्रनीती ही केवळ मुत्सद्दी पणावर अवलंबून नसते तर त्यामागे देशच्या शस्त्रबळाचा महत्वाचा सहभाग असतो असे ते मानत. सावरकर हे अतिशय व्यावहारिक नेते होते आणि स्वप्नाळू राजकारण्यांची त्यांना मनापासून चीड येत असे!

सुदैवाने नरेंद्र मोदी ह्यांचे सरकार २०१४ साली आल्यापासून आपल्या देशाची परराष्ट्र विषयक धोरणे, सावरकर ह्यांच्या सूचने प्रमाणे तंतोतंत आखली जात असल्याचे दिसत आहे. आपण शस्त्रास्त्र निर्मितीत एक मोठा पल्ला गाठला आहे. चीनच्या अरेरावीला आधी डोकलाम व नंतर गालवान येथे चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. लडाख प्रांतात आपली सैन्यदले चिनी सैन्याच्या समोर बरोबरीने उभी आहेत आणि त्यांच्याहून वरचढच ठरत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये कलम ३७० आणि ३५ ए ही दोन्ही रद्द करून काश्मीरचे उर्वरित भारतात संपूर्ण विलीनीकरण केलेले आहे. नुकतेच अमेरिकेच्या पराराष्ट्रमंत्र्यांना सुद्धा आपल्या एस. जयशंकर ह्या तडफदार परराष्ट्रमंत्र्याने जाहीरपणे समज दिलेली आपण पाहिलेली आहे. हा जो नवा भारत आता उदयाला आलेला दिसतो आहे, त्याच्या मागे सावरकर ह्यांनी आपल्याला दिलेली परराष्ट्र नीतीची मूलतत्वेच आहेत! भारत देश असाच प्रगतीच्या मार्गावर उत्तरोत्तर प्रगती करो!

(लेखक आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.