मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदरांना घेऊन केलेल्या उठावानंतर शिवसेनेचे खासदारही आता शिंदे गटात सहभागी झाले आहेत. त्यावरुनच आता त्यांच्यावर टीका होत असताना आता शिंदे गटाचे लोकसभा गटनेते राहुल शेवाळे यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला शनिवारी शेवाळे यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते. बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांसोबत चालणारे आमच्यासोबत येत असल्याचे राहुल शेवाळे यांनी हिंदुस्थान पोस्टला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
(हेही वाचाः ‘आनंद दिघेंबाबत जे झालं त्याचा मी साक्षीदार, वेळ आल्यावर बोलणार!’ मुख्यमंत्र्यांचा इशारा)
विचारांचा वारसा पुढे नेणार
बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे नातू निहार ठाकरे आणि सून स्मिता ठाकरे यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील खरे शिवसैनिक सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासोबत येत असल्याचे राहुल शेवाळे यांनी म्हटले आहे. ते केवळ आमच्यासोबत नाहीत तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि हिंदुत्वाच्या विचारांसोबत येत आहेत. ही लढाई विचारांची आहे आणि हा विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी ते आमच्यासोबत येत असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे.
(हेही वाचाः खरी गद्दारी आणि विश्वासघात कोणी केला? मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल)
आदित्य ठाकरेंनी आत्मपरिक्षण करण्याची गरज
आदित्य ठाकरे यांनी खासदार आणि आमदारांना केलेल्या आव्हानालाही खासदार राहुल शेवाळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी आपलं आत्मपरिक्षण करायला हवं. वरळी विधानसभेतील मतदारांनी आदित्य ठाकरेंना शिवसेना-भाजप युतीमुळे निवडून दिले आहे. त्यामुळे या मतदारांचा सन्मान न राखता त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. त्यामुळे याबाबतचं आत्मपरिक्षण करण्याची आदित्य ठाकरे यांना गरज असल्याचे शेवाळे यांनी म्हटले आहे.