एकीकडे काही एसटीचे कर्मचारी प्रामाणिकपणे काम करत आपले कर्तव्य बजावत असताना, दुसरीकडे मात्र काही कर्मचारी मुजोरी करत असल्याचे समोर येत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा बस स्थानकात एसटी कर्मचा-यांची ही दादागिरी पहायला मिळाली. एसटी बसच्या ड्राईव्हर आणि महिला कंडक्टरने प्रवाशांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेमुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
काय घडला प्रकार?
पालघर जिल्ह्यातील बोईसर बस डेपोतून वाडा येथे निघालेल्या एसटी बसमध्ये वृद्ध पुरुष आणि महिला दाम्पत्य प्रवास करत होते. त्यावेळी एसटी बस ड्राईव्हर गोरखनाथ नागरगोजे वेगाने बस चालवत होता. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रास होत असल्याने, या वृद्ध दाम्पत्याने ड्राईव्हरला गाडीचा वेग कमी करण्यास सांगितले. तेव्हा राग आलेल्या ड्राईव्हरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. तसेच यावेळी ड्राईव्हर आणि महिला कंडक्टरने या प्रवाशांना अरेरावी करण्यास सुरुवात केली.
मारहाणीचा गुन्हा दाखल
वाडा बस स्थानकात हे वृद्ध दाम्पत्य बसमधून उतरल्यानंतर, महिला कंडक्टर शितल पवार हिने त्यांचा पाठलाग करत, त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर ड्राईव्हर नागरगोजेने सुद्धा मारहाण करत, या वृद्ध दाम्पत्याला चिखलात लोळवले आणि बेदम मारहाण केली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. एसटी महामंडळाने याची गंभीर दखल घेतली असून, ड्राईव्हर आणि कंडक्टरला निलंबित करण्यात आले आहे. तसेच या वृद्ध दाम्पत्याने वाडा पोलिस स्थानकात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
Join Our WhatsApp Community