शिक्षणाचे माहेर घर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरात विद्यार्थिनी सुरक्षित आहे कि नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुणे शहरातील विश्रामबाग परिसरात धक्कादायक घटना समोर आली आहे. बारावीत शिक्षण घेत असलेल्या मुलीला ‘गुण’ वाढवून देतो, असे सांगत शरीर सुखाची मागणी करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘त्या’ शिक्षकाची नातेवाईकांनी महाविद्यालय ते पोलिस ठाणे अशी धिंडच काढली. यावेळी त्याच्या अंगावर शाई फेक करत त्याला चांगलाच चोप देण्यात आला. त्या प्रकरणाचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे. अभिजीत पवार असे या शिक्षकाचा नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
(हेही वाचा : चार दिवसांत ‘लव्ह जिहाद’ची ३ प्रकरणे उघडकीस! दोघींची आत्महत्या!)
अभिजित पवार एका मध्यवस्तीत असलेल्या नामांकित महाविद्यालयात शिक्षक आहे. तर पीडित मुलगी येथे बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. या विद्यार्थिनीला मार्क वाढवून देतो म्हणून शिक्षकाने शरीर सुखाची मागणी केली. मात्र तिने याला नकार दिला. त्यानंतरही तो सतत शरीर सुखाची मागणी करत होता. त्याचा त्रास सहन न झाल्याने विद्यार्थिनीने शिक्षकाचे कॉल रेकॉर्ड करत याबाबत घरच्यांना माहिती दिली. त्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. बुधवार, १४ जुलै रोजी दुपारी मुलीच्या कुटुंबीय व नातेवाईकांनी महाविद्यालयात धाव घेतली. तसेच त्या शिक्षकावर शाई फेकत त्याचे तोंड काळे केले. त्यानंतर त्याला चोप देत त्याची धिंड विश्रामबाग पोलिस ठाण्यापर्यंत काढली. त्यामुळे मोठा गोंधळ उडाला आहे. सध्या विश्रामबाग पोलिस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे.
Join Our WhatsApp Community