कोंबड्याचा हॅप्पी बर्थडे दणक्यात साजरा

कोण काय करेल हे सांगता येत नाही. काही दिवसांपूर्वीच जेसीबीचा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आपल्या घरात असणा-या पाळीव प्राण्यांवर घरातील सदस्यांचा जीव जडलेला असतो. पाळीव कुत्रा, पोपट, गाय, बैल, अशा प्राण्यांचे वाढदिवस साजरे केलेले आपण पाहिले वा ऐकले असतील. आता एक असाच भन्नाट आणि आगळावेगळा वाढदिवस साजरा केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.

नागपूर जिल्ह्यातील उमरेड शहरातील कागदेलवार कुटुंबाने आपल्या ‘कुचा’ नावाच्या पाळीव कोंबड्याचा वाढदिवस थाटात साजरा केला आहे. त्याच्या वाढदिवसाचे काही व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर वायरल होतं आहेत.

उमरेडच्या मंगळवार पेठेत कुचा कोंबडा कागदेलवार कुटुंबीयांसोबत राहतो. नुकतंच कागदेलवार कुटुंबात त्याला एक वर्ष पूर्ण झाले. त्यासाठी कुचाची मालकीण असलेल्या सुरभी कागदेलवार यांनी खास सजावट केली होती. यावेळी कुचाचे औक्षण करुन त्याला गोडधोड खाऊ घातले आणि त्याचा दणक्यात वाढदिवस साजरा केला.

विशेष म्हणजे वर्षभरापूर्वी कुचा कोंबड्याचं पिल्लू असताना रस्त्यावर सापडला होता. कोंबड्या घेऊन जाणाऱ्या गाडीतून पडून तो जखमी झाला होता. कुत्रा किंवा मांजर या कोंबड्याच्या पिल्लाला खाईल म्हणून सुरभी कागदेलवार यांनी त्याला आपल्या घरी आणून त्याच्यावर उपचार केले होते. तेव्हापासून तो कागदेलवार कुटुंबातील सदस्य झाला. 20 सप्टेंबरला कुटुंबात त्याला या घरात येऊन एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने त्याचा पहिला वाढदिवस साजरा करण्यात आला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here