अबू आझमींच्या वाढदिवशी नियमांना लागला सुरुंग

राज्यात कोरोनाच्या तिस-या लाटेचा धोका लक्षात घेता, राज्य सरकारने कडक निर्बंध घातले आहेत. त्यांची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी सरकारतर्फे वारंवार आवाहन करण्यात येत आहे. असे असताना मात्र, सरकारमधले आमदार या नियमांना सुरुंग लावताना दिसत आहेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आपल्या वाढदिवशी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे नियमांचा भंग झाल्यामुळे त्यांच्यासह 17 जणांवर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आझमींचे मानखुर्द पॅटर्न सेलिब्रेशन 

समाजवादी पक्षाचे मानखुर्द शिवाजी नगर येथील आमदार अबू आझमी यांनी नुकताच आपला शाही वाढदिवस साजरा केला. त्यावेळी त्यांचा नवाबी थाट दिसून आला. त्याबाबतचा व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये अबू आझमींनी आपली जंगी रॅली काढली. तर आरारा…रारारा… स्टाईलमध्ये तलवारीने वाढदिवसाचा केक कापत, खतरनाक वाढदिवस साजरा केला. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली, तसेच सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमांचा धुरळा उडाला. त्यामुळे त्यांचा हा ‘मानखुर्द पॅटर्न’ पोलिसांना मात्र काही पटला नाही. नियमांचा भंग आणि विनापरवाना हत्यार बाळगल्याने शिवाजीनगर पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

भाजपच्या भातखळकरांची टीका

यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी जोरदार टीका केली आहे. आपल्या वाढदिवशी कोविडचे सर्व नियम धाब्यावर बसवत राज्य सरकारला समर्थन देणा-या अबू आझमी यांनी काढलेली जंगी मिरवणूक आणि समाजाला दाखवलेली तलवार हा निर्लज्जपणाचा कळस आहे, अशी टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे. या मुजोर आमदारावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कारवाई कधी करणार, असा सवालही त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here