प्रवाशाने अडवला लोकल ट्रेनचा दरवाजा, संतप्त नागरिकांनी केली लाथाबुक्यांनी मारहाण! नेमके काय घडले, पहा व्हायरल व्हिडिओ

255

मुंबईच्या लोकल ट्रेनमधून गर्दीच्या वेळी प्रवास करणे अत्यंत कठीण समजले जाते. ट्रेनमध्ये अनेकदा प्रवाशांची बाचाबाची झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. ऐन गर्दीच्यावेळी ट्रेनच्या फुटबोर्डवर उभे राहून दरवाजा अडवणाऱ्या टोळक्यांसोबत तर प्रवाशांचे नेहमीच वाद होतात. मंगळवारी सायंकाळी दिवा स्थानकात उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांना संताप अनावर झाला आणि दरवाजा अडवून उभे असलेल्या दोघांवर हा संताप काढण्यात आला. ट्रेनमधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांनी एकाला ट्रेनमधून फलाटावर खेचून लाथाबुक्यांनी तुडवत मारहाण केली. हा सर्व प्रकार काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केला.

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल 

प्रवाशांमध्ये भांडण होत असल्याचा व्हिडिओ मंगळवारी व्हायरल झाला आहे. ही घटना ३ एप्रिल रोजी दिवा स्थानकात घडली होती. त्यावर तक्रार नोंदवली गेली की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट तपासणी कर्मचार्‍यांना गाड्यांमध्ये तसेच रेल्वे स्थानकांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओच्या आधारे कर्जतकडे जाणारी ही ट्रेन संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास दिवा स्थानकावर आली तेव्हा ही घटना घडली. “आम्हालाही या व्हिडिओच्या माध्यमातून या घटनेची माहिती मिळाली. आम्ही आधीच कर्मचार्‍यांना ट्रेनवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे, असे मध्य रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मुलुंड आणि दिवा या स्थानकांवर काही जलद लोकल ट्रेनला थांबा दिलेला आहे, परंतु या स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडते.

रेल्वे प्रवाशांनी केली तक्रार 

लोकल ट्रेनच्या फुटबोर्डवर उभे राहून ट्रेनचा दरवाजा अडवणारे प्रवासी प्रवाशांना स्थानकावर उतरून देत नसल्याचा आरोप काही रेल्वे प्रवाशांनी केला आहे. प्रवाशांनी तक्रार केली आहे की कर्जत, कसारा किंवा खोपोलीला जाणाऱ्या गाड्यांमधील प्रवासी एकतर इतरांना चढू देत नाहीत किंवा दिवा स्थानकावर उतरू देत नाहीत त्यामुळे वादावादी किंवा काहीवेळा हाणामारीच्या घटना वारंवार घडतात.

https://twitter.com/i/status/1643528847781150720

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.