मुकूट अथवा किरीट    रामलल्लाचे मुकूट २२ कॅरेट सोन्याचे असून त्याचे वजन ७०० ग्रॅम आहे. या मुकूटावर ७५कॅरेटचे हिरे असून १३५ कॅरेटचे पाचू आणि २६२ कॅरेटची माणके जडवलेली आहेत. या मुकुटाची शैली उत्तर भारतीय पद्धतीची असून त्यावर मध्यभागी भगवान सूर्य नारायणाची प्रतिमा साकारलेली आहे.

कुंडले  श्रीरामाची कुंडले सोन्याची असून ती मयूराकारात आहेत. कुंडलांमध्येही हिरे, माणके आणि पाचू जडवलेले आहेत.

टिळा   रामलल्लाच्या मस्तकावरील तिलकही सोन्याचा असून त्याचे वजन सुमारे १६ ग्रॅम आहे. यावर १० कॅरेटचे हिरे जडवलेले आहेत. त्यावर मणिकही आहेत.

कंठहार   अर्धचंद्राकार कंठहारामध्ये हिरे, पाचू आणि माणके जडवलेली आहेत. या कंठहारावरही सूर्यप्रतिमा आहे.

कौस्तुभमणी  प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूंचा सातवा अवतार आहेत. भगवान श्रीविष्णू आणि त्यांच्या अवतारांनी कौस्तुभमणी धारण केला होता, असे मानले जाते. अयोध्येतील रामलल्लाच्या गळ्यातही  कौस्तुभमणी घातलेला असून तो पाचू आणि हिऱ्यांनी सजवलेला आहे.

वैजयंती माळा   भगवान श्रीविष्णुंच्या सर्व अवतारांना वैजयंती माळा प्रिय असते. सोने आणि हिऱ्यांपासून रामलल्लाची ही माळ तयार केली आहे. यावर रामलल्लाला आवडणाऱ्या कमळ, चाफा, पारिजात, कुंद या फुलांचा आणि तुळशीचा समावेश करण्यात आला आहे.

कटिबंध  श्रीराम लल्लाच्या कंबरेला बांधण्यात आलेला कटिबंध ७५० ग्रॅमचा असून त्यावर ७० कॅरेटचे हिरे, ८५० कॅरेटचे माणिक आणि पाचू जडवले आहेत. याला छोट्या छोट्या घंटा लावलेल्या आहेत.

कंकण   श्रीरामाच्या हातात ८५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कंकण आहेत. यावर १०० कॅरेट हिरे आणि ३२ कॅरेट माणिक आणि पाचू जडवले आहेत.