टाइप २ मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. यामध्ये वाढत्या वजनवाढीवर नियंत्रण ठेवणे आणि नियमित चालणे या क्रियांचा समावेश आहे. याबरोबर दिनचर्या आणि ऋतुचर्येचे पालन केल्यास आणि आहारविहाराच्या सवयी सुधारल्यास मधुमेहावर मात करणे सोपे होऊ शकते, असे आयुर्वेदानुसार, उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. मेधुमेहींनी आहाराबाबत 'ही' काळजी घेतल्यास फायदेशीर ठरू शकते, जाणून घ्या.
प्रथिनयुक्त आहार मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. याकरिता आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करावा तसेच कर्बोदके असलेले पदार्थ कमी प्रमाणात खावेत. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या पदार्थांचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे.
दह्याचे सेवन तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, युनायटेड स्टेट्स फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन (FDA)ने दही खाल्ल्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांवर कसा परिणाम होतो, याविषयीचे निर्देश दिले आहेत. तज्ज्ञांच्या मते, दह्याचे सेवन टाईप 2 मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी गुणकारी ठरते.
दही खाण्याचे महत्त्व आठवड्यातून किमान दोन कप दही खाल्ल्याने मधुमेहाचा धोका टाळता येतो. रक्तातील साखर नियंत्रणात राहते. दह्यासारखे आंबवलेले दुधाचे पदार्थ टाइप २ मधुमेह होण्याचा धोका कमी करू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.