राज्याच्या राजकारणात मला सध्या तरी स्वारस्य नाही, मला केंद्रीय राजकारणात बरेच काही शिकायला मिळत आहे. त्यामुळे मी तिकडेच खूश असल्याचे भाजप नेते विनोद तावडे म्हणाले. 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत विनोद तावडे यांचे तिकीट कापल्यानंतर ते राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाले, पण अधूनमधून ते राज्याच्या राजकारणात येणार असल्याच्या चर्चा असतात. तसेच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री म्हणूनही त्यांचे नाव चर्चेत असते. या सर्व चर्चांवर विनोद तावडे यांनी पडदा टाकला असून मी केंद्राच्या राजकारणात काम करणार असल्याचे स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून विनोद तावडे महाराष्ट्राची धुरा सांभाळणार अशा चर्चा सोशल मीडियावर सुरू असतात. त्यावर प्रतिक्रिया विचारल्यानंतर विनोद तावडे म्हणाले की, या गोष्टीमध्ये आजिबात तथ्य नाही. महाराष्ट्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करेल. मला महाराष्ट्रात येण्यास रस नाही. मला केंद्रातल्या राजकारणात काम करायला आवडेल. केंद्राच्या राजकारणात शिकायला खूप मिळते, पण राज्याला ज्यावेळी गरज असेल त्यावेळी मी नक्की सहकार्य करेन. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील कंपूमध्ये विनोद तावडे असल्याच्या काही बातम्या येतात. त्यावर बोलताना विनोद तावडे म्हणाले की, राज्याच्या भाजप संघटनेमध्ये दोन गट नाहीत. महाराष्ट्र भाजप संघटित असून एकदिलाने ते काम करत आहे. एक मराठी माणूस 2024 सालच्या निवडणुकीत देशाच्या राजकारणात एक महत्त्वाची भूमिका बजावतोय हे निश्चितच अभिमानास्पद आहे. प्रमोद महाजन यांच्यानंतर मला हे काम करायला मिळते, असे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.
(हेही वाचा स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर विचारांचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला )
Join Our WhatsApp Community