महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावरून महाराष्ट्राला संबोधित केले. यावेळी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतायत, त्यांच्यामागून जावून सभा घेत बसू नका, असा सल्ला राज ठाकरेंनी शिंदेंना दिला.
नक्की काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले की, ‘गेल्या गुढीपाडव्याच्या सभेत एप्रिलमध्ये मी ज्या गोष्टी बोललो, त्याचा जूनमध्ये तमाशा झाला. अलीबाबा आणि त्यांचे ४० जण गेले. त्यांना मला फक्त चोर म्हणता नाही, कारण ते चोर नाहीत. यांनाच कंटाळून गेले. कोविडच्या काळात हा मुख्यमंत्री माणूस कोणाला भेटायला तयार नव्हता, एक आमदार त्याच्या मुलासोबत भेटायला गेला. तर म्हणाले, मुलाला बाहेर ठेवा आणि फक्त आमदाराला भेटला, का? कोविड म्हणे. मुलामुळे काय होणार होत? कोणालाही भेटत नव्हते, आता अचानक बाहेर पडायला लागले. १९ जून आणि २१ जूनच्या सुमारास कळलं की, एकनाथ शिंदे आमदारांना सुरतला घेऊन गेले. मग गुवाहीला गेले. मला आजपर्यंत एवढंच माहित होतं की, महाराज सुरतवरून लुट करून इथे आले. महाराष्ट्रातील लुट करून सुरतला गेलेले हे पहिलेच. गुवाहाटी काय, गोवा काय या सगळ्या गोष्टी करत करत, आता ते बसलेत मुख्यमंत्री म्हणून.’
‘सभा कसल्या घेत बसलात’
पुढे राज ठाकरे म्हणाले की, ‘एकनाथ शिंदेंना मला एवढंच सांगायचं आहे, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून बसलेले आहात, महाराष्ट्र राज्यासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिकडे सभा घेतायत, त्यांच्यामागून जावून सभा घेत बसू नका. ह्यांनी वरळीला घेतली, ह्यांनी वरळीला घेतली. ह्यांनी खेडला घेतली, तर ह्यांनी खेडला घेतली. गुंतवून ठेवतील, महाराष्ट्राचं काय? एवढे महाराष्ट्रात प्रश्न प्रलंबित आहेत. आज तो पेन्शनचा विषय अडकला आहे, त्याच्यासाठी कर्मचाऱ्यारी संपावर आहेत, मिटवा एकदा काय तो विषय. शेतकऱ्यांचे विषय आहेत, त्यांना लुटलं जातंय ते घ्या हातामध्ये. या अवकाळी पावसामुळे शेतीचं जे नुकसान झालंय, जा शेतकऱ्यांना जाऊन भेटा, सभा कसल्या घेत बसलात.’
(हेही वाचा – कर्तृत्व नव्हतं म्हणून तुम्हाला सहानभुती घ्यावी लागली; संदीप देशपांडेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात)
Join Our WhatsApp Community