ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दिल्लीत आल्यावर AK47ने उडवून टाकू अशा भाषेत संजय राऊतांना संदेश पाठवण्यात आला आहे. याचे सध्या राजकीय वर्तुळात पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलत असताना राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा, अशी टीका केली होती. याला आता देवेंद्र फडणवीसांनी उत्तर देत सुप्रिया सुळेंना टोला लगावला आहे.
प्रसार माध्यमांसोबत बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. त्यामुळे अनेक लोकांना मनातून असे वाटतेय की, मी गृहमंत्री राहिलो नाहीतर बर होईल. पण मी त्या सगळ्यांना सांगू इच्छितो मी गृहमंत्री राहणार आहे. मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्री पदाचा पदभार दिलाय. जे जे चुकीचे काम करतील त्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. गृहमंत्री म्हणून यापूर्वी मी पाच वर्ष पद सांभाळले आहे. आता जे लोके बेकायदेशीर काम करतील त्यांना सोडणार नाही. त्यांच्यावर कारवाई होईल. मी कोणाला घाबरत नाही, कोणाला दबतही नाही, जे कायदेशीर आहे तेच करतो, कायद्यानेच वागतो. कायद्यानेच या ठिकाणी राज्य चालेल.’
सुप्रिया सुळे काय म्हणाल्या होत्या?
‘महाराष्ट्रात दंगली होणे ही खूप गंभीर बाब आहे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातले पाहिजे. मी खासदार संजय राऊत यांच्याशी या विषयावर बोलणार आहे. तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील बोलणार आहे’, अशा सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.
(हेही वाचा – संजय राऊत धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, दारुच्या नशेत…)
Join Our WhatsApp Community