रत्नागिरीत तीन ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

146

भाजप-शिवसेनेच्यावतीने राज्यभरात स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात देवरूख, राजापूर आणि रत्नागिरी या ३ ठिकाणी सावरकर गौरव यात्रा निघणार असल्याची माहिती भाजपाचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली. येत्या ४, ५ आणि ६ एप्रिल रोजी ही यात्रा काढली जाणार आहे. रत्नागिरीमध्ये यात्रेचे नेतृत्व कोकण प्रमुख आमदार नितेश राणे करणार आहेत, असे पटवर्धन यांनी सांगितले.

( हेही वाचा : संजय राऊत धमकी प्रकरणावर फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले, दारुच्या नशेत…)

४, ५ आणि ६ एप्रिलला स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आदर, प्रेमभाव व्यक्त करण्यासाठी भाजपा शिवसेनेच्या वतीने ही गौरव यात्रा १ एप्रिलपासून राज्यात सुरू होत आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सामाजिक समरसतेचा पाया रत्नागिरीत असताना घातला. रत्नागिरीच्या कारागृहातील शिक्षा आणि स्थानबद्धतेच्या वर्षांची नोंद इतिहासाने घेतली असून त्यांचे रत्नागिरीशी नाते वेगळेच होते. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात निघणाऱ्या गौरव यात्रेला विशेष महत्त्व आहे. रत्नागिरीतील ३ तालुक्यांमध्ये सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील यात्रेला देवरूख येथे ४ एप्रिल रोजी सुरुवात होणार असून राजापूर येथे ५ एप्रिल रोजी तर रत्नागिरीत ६ एप्रिल रोजी सावरकर गौरव यात्रा निघणार आहे.

रत्नागिरीतील यात्रेचे नेतृत्व आमदार नितेश राणे करणार असून येथील मध्यवर्ती कारागृहापासून यात्रेला प्रारंभ होणार आहे. त्यानंतर कारागृह जेल नाकामार्गे ही यात्रा स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात पोहोचेल. तेथे सावरकरप्रेमी आणि प्रमुख मान्यवर मनोगत व्यक्त करणार आहेत. या गौरव यात्रेमध्ये जिल्ह्यातील सर्व सावरकरप्रेमींनी सहभागी व्हावे, असे आवाहन पटवर्धन यांनी केले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.