स्वातंत्र्यवीर सावरकरांनी मांडलेला हिंदुराष्ट्रवाद

156

वर्ष १८१८ मध्ये मराठ्यांचा पराभव करून ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानात स्थापन झाली.‌ असे असले तरी संपूर्ण हिंदुस्थानवर ब्रिटिशांनी कधीच राज्य केले नाही. ब्रिटिशांची सत्ता हिंदुस्थानात असताना हिंदुस्थानातील अनेक संस्थाने स्वतंत्र होती. म्हणूनच देश स्वतंत्र झाल्यावर या संस्थानांना हिंदुस्थानात विलीन करून घेण्यात आले. यावरूनच हे निश्चित होते की ब्रिटिशांनी संपूर्ण हिंदुस्थानवर त्यांची सत्ता प्रस्थापित केली नव्हती.‌

ब्रिटिशांची ही जुलमी सत्ता उधळून लावण्यासाठी वर्ष १८५७ मध्ये प्रयत्न केला गेला. हा प्रयत्न म्हणजेच हिंदुस्थानचे पहिले स्वातंत्र्य युद्ध. पण या युद्धात जरी आपल्याला यश मिळाले नसले तरी ब्रिटिश सरकारचे धाबे दणाणून गेले. अशा प्रकारचा युद्धाचा प्रयत्न पुनश्च घडून आला तर आपल्याला या देशात राज्य करणे अशक्य होईल हे ब्रिटिश सरकारच्या ध्यानात आले. म्हणून ब्रिटिश सरकारने मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालयात २८ डिसेंबर वर्ष १८८५ या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली. त्यावेळी बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते. या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे संस्थापक होते महासचिव ए ओ ह्यूम! भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कलकत्त्यामधील योगेश चंद्र बॅनर्जी यांची नियुक्ती ए. ओ. ह्यूम यांनी केली. या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून सनदशीर मार्गाने मागण्या केल्या तर ब्रिटिश सरकार त्या मागण्यांची पूर्तता करणार होते. अशी मोकळीक ठेवल्यामुळे पुनश्च देशात सशस्त्र क्रांतीचा प्रयत्न केला जाणार नाही असे ब्रिटिश सरकारला वाटले.

त्या वेळच्या राजकीय पुढाऱ्यांनी याचा स्वीकार केला. आपल्या देशात हिंदू मुसलमान समाज गुण्यागोविंदाने नांदावा आणि संघटित होऊन देश स्वतंत्र करण्यासाठी एकत्रितपणे लढा द्यावा या हेतूने, एक प्रयोग म्हणून त्या वेळच्या नेत्यांनी स्वतःला हिंदू म्हणवून घेण्याऐवजी हिंदी म्हणवून घेण्यास आरंभ केला. याचाच अर्थ हिंदू समाज राजकीय दृष्ट्या हिंदी झाला. मुसलमान समाजाने हिंदूंप्रमाणेच स्वतःला राजकीय दृष्ट्या हिंदी मानावे अशी अपेक्षा होती. पण ती अपेक्षा पूर्ण झाली नाही. त्यामुळे मुसलमान समाज हिंदू समाजाप्रमाणे राजकीय दृष्ट्या हिंदी न होता मुसलमानच राहिला. मुसलमान समाजाने प्रारंभापासून स्वतःला वेगळे ठेवले.

वर्ष १८८८ मध्ये सर सय्यद अहमद (अलिगड विद्यापीठाचे संस्थापक) यांनी, ‘हिंदुस्थानात दोन राष्ट्रे नांदत आहेत. एक हिंदू राष्ट्र आणि दुसरे मुसलमान राष्ट्र. या देशातून ब्रिटिश सत्ता नष्ट झाल्यावर या देशाचे राजे हिंदू असतील की मुसलमान असा प्रश्न उपस्थित केला? या दोन समाजांमध्ये संघर्ष होऊन जो समाज जिंकेल तो सत्ता उपभोगेल.’ अशा प्रकारचे उद्गार त्यांनी काढले.

यातून एक गोष्ट स्पष्ट झाली ती म्हणजे हिंदू मुसलमान ऐक्य हा भ्रम आहे. सर सय्यद अहमद यांनी काढलेले उद्गार म्हणजेच द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत आहे.‌ वर्ष १८८८ मध्ये असा सिद्धांत सर सय्यद अहमद यांनी मांडला. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्म १८८३ मधला आहे. याचा अर्थ सर सय्यद अहमद यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला त्यावेळी सावरकर पाच वर्षांचे होते. तरीही सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला असे सांगितले जाते.

त्यानंतर १९०६ मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. तरी काही मुसलमान काँग्रेसमध्ये राहिले होते. ही घटना घडत असताना सावरकर बॅरिस्टर होण्यासाठी लंडनला रवाना झाले होते. तिथे शिकत असताना सावरकरांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा विषय आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या व्यासपीठावर मांडला. मादाम कामा यांच्या हस्ते स्टुटगार्डला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा ध्वज फडकावला. त्यामुळे बॅरिस्टरचे शिक्षण घेणारा तरुण विद्यार्थी ब्रिटिशांच्या नजरेत आला. सावरकरांचे एकंदरीत राजकीय विचार ब्रिटिश सत्तेला हादरा देणारे होते. स्वाभाविकपणे स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी ब्रिटिश सरकारच्या हृदयात धडकी भरली.‌

बॅरिस्टर होण्यासाठी पद्धतशीरपणे सावरकरांनी पासपोर्ट घेतला होता. तरीसुद्धा सावरकरांना अटक करण्यासाठी ब्रिटिश सरकारने सावरकर म्हणजे हिंदुस्थानातून फरार झालेला अपराधी आहे असे घोषित केले. त्यांच्यावर खटला भरला आणि त्यांना २५ वर्षांच्या काळ्यापाण्याच्या दोन शिक्षा ठोठावल्या.‌ अशा प्रकारे सावरकरांना पन्नास वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

सावरकर अंदमानात शिक्षा भोगत असताना ब्रिटिश सरकारने राजकीय बंदिवानांची सुटका करण्यासाठी एक कायदा पारित केला. त्या कायद्याप्रमाणे आपली सुटका करून घेण्यासाठी सावरकरांनी ब्रिटिश सरकारशी पत्रव्यवहार केला.‌ बंदिवानांच्या सुटकेसाठी केलेल्या कायद्याचा आधार घेऊन स्वतःच्या सुटकेचा सावरकरांनी प्रयत्न केला याचा अर्थ लोकांनी सावरकरांनी क्षमा मागितली असा लावला. कारागृहात अडकून पडण्यापेक्षा कारागृहातून सुटल्यावर देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न करता येईल या हेतूने सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे तशा प्रकारचा पत्रव्यवहार केला.‌

अशा घटना घडत असतानाच लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राजकीय नेतृत्व महात्मा गांधींकडे आले. महात्मा गांधींनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून देशाच्या स्वातंत्र्यलढ्याची राजनिती आखली. महात्मा गांधी स्वभावाने मावळ होते. युद्ध शास्त्राचा त्यांचा अभ्यास नव्हता. सशस्त्र संघर्ष करण्यासाठी त्यांची मानसिक सिद्धता नव्हती. त्यामुळे त्यांनी त्यांच्या स्वभावाला अनुसरून देशाचे स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला.‌ हा प्रयत्न करताना सत्य, अहिंसा आणि असहकार अशा साधनांच्या बळावर देश स्वतंत्र करायचा अशी गांधींची राजनिती होती. थोडक्यात महात्मा गांधींनी या चौकटीच्या बाहेर जाऊन कोणताही प्रयत्न करायचा नाही, असे ठरवले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा स्वभाव, त्यांचा पिंड वेगळा होता. ते आक्रमक वृत्तीचे होते. त्यांच्यात क्षात्रतेज तळपत होते. त्यांचा युद्धशास्त्राचा अभ्यास दांडगा होता. त्याचबरोबर कोणत्याही मार्गाचा अवलंब करून देश स्वतंत्र करण्यासाठी त्यांनी स्वतःला पूर्ण मोकळीक दिली होती. देशाच्या स्वातंत्र्यासाठी कोणत्याही मार्गाचा अवलंब करण्यास सावरकरांनी स्वतःला कोणत्याही बंधनात अडकून घेतले नाही. देशातल्या मुसलमान समाजाची पृथक वृत्ती सावरकरांनी अनुभवली होती. मुसलमान समाज स्वतःला स्वतंत्र राष्ट्र मानतो याचा अनुभव त्यांनी घेतला होता. म्हणूनच हिंदू मुसलमान ऐक्य हे दिवास्वप्न आहे ते सत्यात कधीही उतरणार नाही. यावर त्यांचा ठाम विश्वास होता. या उलट महात्मा गांधी प्रेमाने, हृदय परिवर्तन करण्याचा प्रयत्न करून मुसलमान समाजाला हिंदू समाजाशी एकरूप करण्याचा प्रयत्न करत होते. हा प्रयत्न करताना त्यांनी देशाचा स्वातंत्र्याला दुय्यम स्थान दिले. त्यांच्या दृष्टीने हिंदू मुसलमान ऐक्य जोपर्यंत होत नाही तोपर्यंत देश स्वातंत्र्याला अर्थ नाही.

(हेही वाचा – सावरकर, आंबेडकर आणि अस्पृश्यता)

सावरकरांची याबाबत दृष्टी वेगळी होती. हिंदू मुसलमान ऐक्य होवो न होवो देशाचे स्वातंत्र्य आपण प्रथम संपादन केले पाहिजे. मुसलमानांच्या अटीवर देश स्वातंत्र्य अवलंबून नाही. हिंदू समाज मुसलमानांच्या ताटाखालचे मांजर होणार नाही. अशी रोखठोक भूमिका सावरकरांनी घेतली. मुसलमान समाजाने हिंदू समाजाशी एकोप्याने राहावे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय अत्याचार हिंदू समाजाकडून होणार नाही. अशी ग्वाही सावरकरांनी दिली होती.‌ मुसलमान समाजाला हिंदुस्थानचा मालकी हक्क देता येणार नाही. असे स्पष्ट मत सावरकरांनी वेळोवेळी मांडले होते. देशाच्या स्वातंत्र्याचा आणि देशावरच्या मालकी हक्काचा त्याग करून मुसलमान समाजाशी ऐक्य जोडण्यात सावरकरांना स्वारस्य नव्हते.

मुसलमान जरी या देशाचे राज्यकर्ते झाले तरी महात्मा गांधींना ते मान्य होते. मुसलमान समाजाशी ऐक्य साधणे ही गोष्ट त्यांना देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा अधिक महत्त्वाची वाटत होती. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी या दोन राजकीय नेत्यांच्या राजकीय तत्वज्ञानातला हा फरक होता. गांधींनी मांडलेल्या राजनितीला हिंदी राष्ट्रवाद म्हणून संबोधले गेले. सावरकरांनी मांडलेल्या राजनितीला हिंदुराष्ट्रवाद म्हणून संबोधले गेले. सावरकरांनी वर्ष १९२४ हिंदुत्व हा ग्रंथ लिहून आपली राजकीय भूमिका, राजनिति अधिक सुस्पष्ट केली.

स्वातंत्र्यवीर सावरकर आणि महात्मा गांधी हे दोघेही एकाच कालखंडात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय सहभागी झाले होते. दोघांच्या राजनितीतला हा फरक होता. अहिंसेच्या मार्गाने मुसलमानांच्या पृथ:कतेला आणि हिंसक वृत्तीला कसे आटोक्यात आणायचे हे गांधींच्या लक्षात येत नव्हते. गांधींच्या कोणत्याही प्रयत्नाला मुसलमान समाजाकडून त्यांना अपेक्षित असलेला प्रतिसाद मिळत नव्हता. तरीही गांधींना खात्री होती की ब्रिटिश सत्तेचा अंत होताच हिंदू आणि मुसलमान एकत्र येतील. पण प्रत्यक्षात तसे घडले नाही.

(क्रमशः)
(लेखक व्याख्याते आहेत.)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.