२५ वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा घेतला सूड! भररस्त्यात बांधकाम व्यवसायिकावर झाडल्या गोळ्या, चौघांना अटक

92

नवीमुंबईत दिवसाढवळ्या एका बांधकाम व्यवसायिकाला गोळ्या झाडून ठार करण्यात आले होते, या खुनाचा छडा लावत नवीमुंबई पोलिसांनी गुजरात आणि बिहार राज्यातून मुख्य आरोपीसह ३ भाडोत्री गुंड अशी एकूण चौघांना अटक केली आहे. २५ वर्षांपूर्वी गुजरात राज्यात झालेल्या खुनाचा सूड घेण्यासाठी नवी मुंबईतील बांधकाम व्यवसायिकाची हत्या केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

( हेही वाचा : Mumbai Rain : मुंबईत मार्च की जुलै? नेटकऱ्यांचा सवाल, ट्विटरवर अनेक व्हिडिओ व्हायरल )

मेहक जयरामभाई नारीया (२८), कौशला कुमार विजेंद्र यादव (१८)गौरव कुमार यादव (२४) आणि सोनू कुमार यादव (२३) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहे. मेहक गुजरात राज्यातील राजकोट येथे राहणारा असून इतर तिघे हे बिहार राज्यातील खगडीया जिल्ह्यातील राहणारे असून हे तिघे भाडोत्री गुंड आहेत.

नवी मुंबईतील नेरुळ सेक्टर ६ अपना बाजार मार्केट समोर भररस्त्यात मोटारसायकलवरून आलेल्या दोघांनी सावजीभाई गोकर मंजेरी (५६) या बांधकाम व्यवसायिकाची गोळ्या झाडून हत्या करून पळ काढला होता. या गोळीबारात सावजीभाई यांचा जागीच मृत्यू झाला होता. नेरुळ सेक्टर ११ मध्ये राहणारे सावजीभाई या बांधकाम व्यवसायिकाच्या हत्येने नवीमुंबई हादरली होती, तसेच बांधकाम व्यवसायिकामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.

या गुन्ह्याच्या तपासासाठी नवीमुंबई गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिस ठाण्यात विविध पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकाने तांत्रिक तपास तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून हल्लेखोरांच्या मोटार सायकचा क्रमांक मिळवला असता ही मोटारसायकल गुजरात राज्यातील मेहक नारीया याची असल्याचे समोर आले. पोलीस पथक गुजरातमध्ये दाखल झाले व मेहक नारीया याला ताब्यात घेण्यात आले, त्याच्या चौकशीत हल्लेखोरांची नावे समोर आली व बिहारला पळून जाण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या तीन हल्लेखोरांना अटक करण्यात आली.

बांधकाम व्यवसायिक सावजीभाई याने १९९८ बच्चूभाई पटणी यांची गुजरातमध्ये हत्या केली होती, त्यानंतर तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्याने २०२२ मध्ये अटक आरोपी मेहक याच्या नातेवाईकाना आपल्या गुंडामार्फत भरचौकात मारहाण केली होती. हा राग मनात ठेवुन मेहक याने मुंबईतील एका इसमाच्या मदतीने बिहार राज्यातून तीन भाडोत्री गुंडांना सावजीभाई यांच्या हत्येची सुपारी दिली होती. या तिघांनी सावजीभाई यांच्यावर पाळत ठेवून संधी मिळताच नेरुळ सेक्टर ६ येथून घरी जाण्यासाठी मोटारीने निघालेल्या सावजीभाई यांच्यावर जवळून गोळ्या झाडून पसार झाले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.