दादर छत्रपती शिवाजी महाराज उद्यान (शिवाजी पार्क) परिसरात बेकायदेशीर प्राणीसंग्रहालयावर वन विभागाने कारवाई करून दुर्मिळ प्रजातीचे कासव, साप, कोळी इत्यादी ताब्यात घेण्यात आले आहे. या ठिकाणी बेकायदेशीररित्या प्राणीसंग्रहालय चालवले जात असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी राकेश भोईर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’ शी बोलतांना सांगितले. याप्रकरणी वन्यजीव संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती भोईर यांनी दिली.
दादर शिवाजी पार्क, वीर सावरकर मार्गावर एक पिता-पुत्र बेकायदेशीर प्राणी संग्रहालय चालवत असल्याची माहिती वनविभागाचे अधिकारी राकेश भोईर यांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे वनविभागाने सदर ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी काही वन्यजीव आणि दुर्मिळ प्रजातीचे कासव, अजगर, विदेशी कोळी, विदेशी बेडूक इत्यादी आढळून आले.
या वन्यजीवांचे प्रदर्शन मांडून ते बघण्यासाठी लोकांकडून प्रत्येकी २० रुपये घेतले जात होते, असे वनविभागाच्या पाहणीत आढळून आले, या वन्यजीवांना लोकांसाठी प्रदर्शनात ठेवण्याची आणि प्रवेशासाठी पैसे आकारण्याची केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या नियमांनुसार परवानगी नाही.
याला जबाबदार असलेल्या लोकांना आम्ही अद्याप अटक केलेली नसल्याची माहिती वन विभागाचे रेंज अधिकारी राकेश भोईर यांनी ‘हिंदुस्थान पोस्ट’शी बोलताना दिली. ते प्राणी, विशेषतः शेड्यूल-१ संरक्षित प्रजातींच्या ताब्यात कसे आले याचा आम्ही अजूनही तपास करत आहोत. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल, असे भोईर यांनी सांगितले.
(हेही वाचा अँटिलिया आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचे धागेदोरे नेपाळपर्यंत पोहचले)
Join Our WhatsApp Community