नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या ४५ वर्षीय रुग्णाने रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी घडली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी दिली.
( हेही वाचा : “बाळासाहेब ठाकरे-वाजपेयींच्या सभेला मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली!” आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा)
अविनाश सावंत असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. मूळचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात राहणाऱ्या अविनाशला हृदयाचा त्रास असल्यामुळे महिन्याभरापूर्वी त्याला नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अविनाशवर उपचार सुरू असताना मंगळवारी सकाळी अचानक तो दुसऱ्या मजल्यावरील बाथरूममध्ये गेला व तेथील खिडकीतून उडी घेतली, यामध्ये तो गंभीररीत्या जखमी झाला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्याला जखमी अवस्थेत अतिदक्षता विभागात आणले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे निदान करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली आहे. अविनाश सावंत हा अविवाहित होता, व मागील महिन्याभरापासून त्याच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी दिली. आजारपणाला कंटाळून त्याने टोकाचे पाऊल उचलले असावे अशी प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
Join Our WhatsApp Community