Nitesh Rane On Love Jihad: लव्ह जिहादवरून नितेश राणे आक्रमक; म्हणाले, पीडितांनी न घाबरता तक्रारी करा

90

राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी मंगळवारी केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहनही नितेश राणे यांनी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, राम सातपुते, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.

आमदार अबु आझमी आणि जितेंद्र आव्हाड छातीठोकपणे ‘लव्ह जिहाद’ होतच नाही, धर्मांतर होतच नाही असा दावा करत असतात. मात्र अशा अनेक घटनांचे पुरावे आमच्याकडे आहेत असे सांगत नितेश राणे यांनी पुराव्यानिशी आणि ध्वनीचित्रफीती सकट राज्यातील ‘लव्ह जिहाद’बाबतचे कटु वास्तव सर्वांसमोर मांडले.

नितेश राणे म्हणाले की, ‘लव्ह जिहाद’ नसतोच असे म्हणणाऱ्यांची बोलती दौंड येथील कमाल कुरेशी आणि पीडित हिंदू तरुणाची तसेच खुद्द कुरेशीच्या पत्नीची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर बंद होईल, असे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. हिंदू समाजाच्या लोकांना फसवणाऱ्या जिहादी प्रवृत्तीला आम्ही आळा घातल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. या पार्श्वभूमीवर अबु आझमी आणि जितेंद्र आव्हाड हे आमदार ‘लव्ह जिहाद’ नाहीच, धर्मांतर होतच नाही असे ठामपणे सांगतात. याचा अर्थ या आमदारांचे ‘लव्ह जिहाद’ला समर्थन आहे का असा परखड सवाल नितेश राणे यांनी विचारला.

जबरदस्तीने हिंदू तरुण वा तरुणींचे धर्मांतर आम्ही कदापि खपवून घेणार नाही असा इशारा नितेश राणे यांनी दिला. भाजपाचे मंत्री, आमदार, सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण, न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदू समाज व सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही नितेश  राणे यांनी पीडितांना दिला.

(हेही वाचा – संजय राऊत महागद्दार, हिंमत असेल तर राजीनामा द्यावा; मंत्री शंभूराज देसाईंचा विधानसभेत घणाघात)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.