भाजप खासदार गिरीश बापट यांचे निधन

107

भाजप ज्येष्ठ नेते, खासदार गिरीश बापट यांचे प्रदीर्घ आजारामुळे बुधवारी निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. बुधवारी, ७२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. माहितीनुसार, गिरीश बापटांचे पार्थिव दुपारी २ ते ६ पर्यंत शनिवार पेठेतील निवासस्थानी अंतदर्शनासाठी असेल. त्यानंतर सायंकाळी ७ वाजता वैकुंठस्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील.

नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत गिरीश बापट यांनी तब्येतीची परवा न करता कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते. यावेळी ऑक्सिजनची श्वसन नलिका लावल्यामुळे गिरीश बापट यांनी ऑक्सिजन सिलेंडरसह कसबा कार्यालय गाठले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीचा आनंद पाहायला मिळाला होता. ‘पुण्याची ताकद, गिरीश बापट’ अशा घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून निघाला होता.

पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट यांना ‘भाऊ’ म्हणून ओळखले जायचे. दांडगा लोकसंपर्क ही त्यांच्या जमेची बाजू होती. तसेच विरोधी पक्षाची सत्ता असली तरी आपले काम कसे साध्य करायचे याचे कसब गिरीश बापटांमध्ये उत्तम अवगत होते. जेव्हा पुण्यात शरद पवारांचे वर्चस्व होते, तेव्हा बापट यांनी आपले अढळ स्थान निर्माण केले होते. पुणे जिल्ह्यात भाजप वाढवण्यात गिरीश बापटांचे मोठे योगदान आहे.

दरम्यान आणीबाणीच्या काळामध्ये गिरीश बापटांना १९ महिन्यांचा कारवास झाला होता. नाशिक जेलमध्ये त्यांना ठेवण्यात आले होते.

खासदार बापट यांचा अल्प परिचय

गिरीश बापट यांचा जन्म ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे झाला होता. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बापट स्वयंसेवक होते. १९७३ साली टेल्को कंपनीत नोकरी केली. त्यानंतर कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला. १९८३ साली पहिल्यांदा नगरसेवक म्हणून गिरीश बापटांची निवडून आले. सलग तीनवेळा नगरसेवक होते. १९९३ मध्ये झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बापट यांचा पराभव झाला होता. मात्र १९९५ पासून कसबा पेठ मतदारसंघात सलग पाच वेळा आमदार म्हणून विजयी झाले होते. राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही काम पाहिले होते. २०१९ मध्ये पुण्याचे खासदार म्हणून विक्रमी मताधिक्याने निवडून दिल्लीत गेले होते. मात्र त्यानंतर दुर्धर आजाराने बापट आजारी होते. आजारपणातही ते राजकारणात सक्रिय होते. याचे उदाहरण म्हणजे नुकत्याच झालेल्या कसबा पेठ विधानसभेच्या पोटनिवडणुकीत बापट यांनी व्हिलचेअर बसून आणि कृत्रिम श्वासोच्छवास घ्यावा लागत असतानाही पक्षनिष्ठा आणि बांधिलकीसाठी प्रचारात सक्रिय असल्याचे दिसून आले होते.

(हेही वाचा – “बाळासाहेब ठाकरे-वाजपेयींच्या सभेला मैदान भरलं नाही, मी सात लाखांची गर्दी जमवली!” आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्याची चर्चा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.