ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून हटवून ज्येष्ठ नेते, खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा अध्यक्षांना अधिकृत पत्र लिहून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री शिंदे यांच्या गटाला शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह दिल्यानंतर अंतर्गेत राजकीय पडसाद पडताना पाहायला मिळत आहेत. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवून महत्त्वाचा बदल केला आहे.
काही दिवसांपूर्वी गजानन किर्तीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी गजानन किर्तीकर यांना शिवसेनेच्या संसदीय नेतेपदाची जबाबदारी दिली आहे.
माहितीनुसार, फेब्रुवारी महिन्यात झालेल्या कार्यकारणीच्या बैठकीत शिवसेनेच्या संसदीय नेतेपदावरून संजय राऊतांना हटवून गजानन किर्तीकरांची निवड करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्या प्रस्तावाला मंजूरी मिळाली होती. त्यानुसार या महत्त्वाच्या बदलाची माहिती मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेकडून लोकसभा अध्यक्षांना देण्यात आली आहे.
खेडच्या सभेत किर्तीकरांनी ठाकरेंवर साधला होता निशाणा
दरम्यान काही दिवसांपूर्वी खेडमध्ये शिवसेनेच्या झालेल्या सभेत गजानन किर्तीकर यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. ज्यावेळी महाविकास आघाडीमध्ये जाण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. त्याचवेळी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपली होती अशी टीका गजानन किर्तीकर यांनी केली होती. शिवसेनेची आक्रमकता संपण्याला खरे कारण आहे ते म्हणजे महाविकास आघाडीसोबत जाणे. त्यामुळेच मराठी माणसांचा विकासही खुंटला असल्याचेही किर्तीकर म्हणाले होते.