मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने दावा ठोकल्यानंतर येथील कार्यालय कायमचेच सिलबंद झाले. परंतु हे कार्यालय बंद झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी तसेच माजी नगरसेवक हे काही महापालिकेत फिरकत नाही कि या कार्यालयातील कर्मचाऱ्यांची विचारपूस करत नाहीत. एका बाजुला उद्धव ठाकरे गटाचे शिवसेनेचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे हे एकनिष्ठेचे दाखले देत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे कौतुक करत असले तरी निष्ठेने पक्षासोबत राहिलेल्या या कार्यालयीन कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून पगारच मिळालेला नाही. परंतु त्या कर्मचाऱ्यांना पगार देण्याची साधी तसदीही उद्धव ठाकरे यांनी घेतलेली नसल्याने मागील काही महिन्यांपासून हे कर्मचारी पगाराविना आहेत. त्यामुळे नोकरी टिकून रहावी यासाठी हे कर्मचारी महापालिकेत येत असले तरी पगारच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
मुंबई महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयात तीन कर्मचारी कार्यरत असून त्यातील एक कर्मचारी १९८५ पासून तर उर्वरीत दोन कर्मचारी हे २००७-०८ पासून कार्यरत आहेत. त्यामुळे तब्बल ३८ ते १६ वर्षांपासून हे पक्ष कार्यालयात काम करत आहेत. परंतु शिवसेनेचे दोन शकले पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी या कार्यालयावर दावा ठोकल्यानंतर कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून शिवसेनेसह सर्वच राजकीय पक्षांच्या कार्यालयांना सिल ठोकण्यात आले. त्यानंतर हे कर्मचारी येथील बंद कार्यालयाबाहेरील बाकड्यांवर येवून बसत होते, परंतु कालांतराने हे बाकडेही महापालिका प्रशासनाने हटवले.
(हेही वाचा जळगावमध्ये सप्तश्रृंगी देवीच्या पालखीवर मुसलमानांकडून दगडफेक )
हे बाकडे असताना शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे माजी नगरसेवक व पदाधिकारी दैनंदिन हजेरी लावत होते. ज्यामुळे या माजी नगरसेवकांकडून मागील थकबाकी किंबहुना पक्षाच्या आदेशानुसार एकेक महिन्याचे शुल्क पक्षाच्यावतीने वसूल करून त्यातून या कर्मचाऱ्यांच्या पगाराची तजविज केली जात होती. परंतु मागील दोन ते तीन महिन्यांपासून मुख्यालयात उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक तथा पदाधिकारीच फिरकत नसून या कार्यालयातील तिन्ही कर्मचाऱ्यांच्या पगाराचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कर्मचाऱ्यांना मागील दोन ते तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नसून पक्षाच्या एकाही माजी नगरसेवकाकडून या कर्मचाऱ्यांची विचारपूस केली जात नाही कि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारीही त्यांच्या पगारासाठी प्रयत्न करत नाही. त्यामुळे पगार नसल्याने या तिन्ही कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली असून घरच्यांना कळू नये म्हणून आणि नोकरीवरील दावा टिकून राहावा म्हणून हे कर्मचारी कामाच्या ठिकाणी येत असतात. परंतु दोन शिवसेनेच्या वादात या निष्पाप आणि गरीब कर्मचाऱ्यांच्या साध्या पगाराचीही व्यवस्था उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना कोणा नेत्याला अथवा पदाधिकाऱ्यांना सांगून करता येत नाही. महापालिकेतील शिवसेना पक्ष कार्यालयासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी आपली हयात घालवली, त्या कार्यालयीन कर्मचाऱ्यांकडेच पक्षप्रमुखांचे आणि नेत्यांचे दुर्लक्ष होत असेल तर पक्षातील निष्ठावान कार्यकर्त्यांची काय अवस्था असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Join Our WhatsApp Community