शैक्षणिक हक्क कायद्यानुसार अर्थात ‘आरटीई’ नुसार दुर्बल व वंचित घटकातील पाल्यांना संबंधित निकषांनुसार विविध शाळांमध्ये प्रवेश देण्यात येतो. गेल्यावर्षीप्रमाणेच यंदादेखील याची कार्यवाही ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत आहे. या अनुषंगाने बालकांना प्रवेश घेण्यासाठी १७ मार्च २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. तथापि, पालकांची मागणी लक्षात घेऊन राज्याचे शिक्षण संचालक (प्राथमिक) यांच्या निर्देशांनुसार ही मुदत २५ मार्च २०२३ पर्यंत वाढविण्यात आली आहे. याबाबतची अर्ज प्रक्रिया व संबंधित माहिती ही https://student.maharashtra.gov.in किंवा http://education.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजू तडवी यांनी कळविली आहे.
बृहन्मुंबई महापालिका – शिक्षण विभाग शैक्षणिक वर्ष २०२३ – २४ करिता बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ अंतर्गत खासगी विनाअनुदानित प्राथमिक शाळांतील (अल्पसंख्यांक शाळा वगळून) प्रवेशाच्या सुरुवातीच्या वर्गात वंचित व दुर्बल घटकांतील बालकांसाठी राखीव प्रवेशाच्या २५ टक्के जागा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या प्रणालीद्वारे भरण्यासाठी १ मार्च ते १७ मार्च २०२३ पर्यंत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली होती. तथापि, पालकांच्या मागणीनुसार ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता २५ मार्च २०२३ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे. मात्र, २५ मार्च २०२३ नंतर कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची कृपया नोंद घ्यावी, असेही शिक्षणाधिकारी तडवी यांनी कळविले आहे.
(हेही वाचा स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर विचारांचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला )
Join Our WhatsApp Community