रामनवमीच्या आदल्या रात्री छत्रपती संभाजीनगरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलीची विशेष तपास पथकामार्फत तपास सुरू आहे. विशेष पथकाने शनिवारी १ एप्रिल रोजी आणखी चार दंगलखोरांना गजाआड केले. चारही दंगलखोरांना सोमवार ३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ए.एस. वानखेडे यांनी दिले.
इमरान खान बिस्मिल्ला खान (वय ३४, राहणार बायजीपुरा), सय्यद कलीम सय्यद सलीम (वय २२, राहणार रहेमानिया कॉलनी), करीम सलीम शेख (वय २६, राहणार गल्ली क्रं.४, संजयनगर) आणि अन्वर खान कादर खान ऊर्फ सोनु (वय २८, राहणार किराडपुरा) अशी आरोपींची नावे आहेत. गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने अधिक तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील समीर बेदरे यांनी न्यायालयाकडे केली होती.
छत्रपती संभाजीनगरच्या किराडपुरा भागात तरुणांच्या दोन गटात गुरुवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर नंतर जाळपोळ, दगडफेक आणि हाणामारीत झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार, अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. या घटनेनंतर पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी तपासासाठी एसआयटी नेमली. यात सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वाखाली सात पोलीस अधिकारी आणि तीन पोलीस कर्मचान्यांचे पथक या दंगलीची चौकशी करित आहेत. दरम्यान, या दंगलीस कारणीभूत ठरलेल्या २० ते २५ जणांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि सीडीआरच्या आधारे पोलिसांनी तपास करुनवरील चौघा आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.
(हेही वाचा – मविआच्या सभेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, संजय शिरसाट यांचा इशारा)
Join Our WhatsApp Community