राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) ‘स्लिपर’ बस बनविण्याच्या निर्णय घेतला आहे. दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळा येथे 50 स्लिपर बस बनविण्यात येणार आहेत. येत्या वर्षात या स्लीपर बस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील, असा विश्वास एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी व्यक्त केला.
एसटी महामंडळाने वेळोवेळी प्रवाशांच्या सेवेत नवनवीन बसचा समावेश केला आहे. जुन्या बसपासूनचा प्रवास आता “शिवाई’ ई-बस पर्यंत येऊन ठेपला आहे. पण, अजूनही प्रवाशांच्या मागणीनुसार विविध बस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून केला जात असल्याचे दिसून येते. अलिकडे रात्रीच्या वेळी लांब पल्ल्यांचा प्रवास करताना नागरिकांकडून स्लीपर बसला प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळेच मध्यवर्ती कार्यशाळेत 50 स्लिपर बस बनविण्यात येणार आहेत.
(हेही वाचा “मशिदींची मुजोरी संपवावी…” राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर; पहा संपूर्ण व्हिडिओ)
खासगी ट्रॅव्हल्सप्रमाणे प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी एसटी महामंडळाने काही वर्षांपूर्वी शिवशाही वातानुकूलित शयनयान बसगाड्या आपल्या ताफ्यात दाखल केल्या. या बसगाड्या सेवेत आल्यानंतर जादा भाडेदरामुळे या गाड्यांकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. यानंतर आता एसटी महामंडळाने फक्त शयनयान बस प्रवाशांसाठी सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Join Our WhatsApp Community