मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराचे ३१ मार्च २०२३ अखेर म्हणजे सन २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये एवढा महसूल गोळा केला. निर्धारित लक्ष्य ४ हजार ८०० कोटी रुपयांचे होते. त्यातुलनेत तब्बल ७७५ कोटी रुपयांचे म्हणजेच १६.१४ टक्के अधिक महसूल कराच्या स्वरूपात वसूल करण्यात करनिर्धारण व संकलन खात्याला यश आले आहे.
( हेही वाचा : मविआच्या सभेमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये परिस्थिती चिघळल्यास आयोजक जबाबदार, संजय शिरसाट यांचा इशारा )
‘मालमत्ता कर’ हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असून हा ‘मालमत्ता कर’ नागरिकांनी वेळेत महानगरपालिकेकडे जमा करावा, यासाठी महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) श्री. पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनाखाली करनिर्धारण व सकंलन खात्याचे सहआयुक्त सुनील धामणे यांनी वर्षभर प्रयत्न करत निश्चित लक्ष्याच्या तुलनेत अधिक महसूल गोळा केला आहेत. त्यामुळेच ३१ मार्च, २०२३ रोजी मध्यरात्री १२ वाजता संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही ५ हजार ५७५ कोटी ४४ लाख रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे आणि सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) महेश पाटील यांनी दिली आहे.
अतिशय सुयोग्य नियोजन व परिणामकारक अंमलबजावणी यामुळे निर्धारित लक्ष्य रुपये ४ हजार ८०० कोटींपेक्षा साडेसातशे कोटी रुपये अधिक म्हणजेच ५ हजार ५७५ कोटी रुपयांचा मालमत्ता कर गोळा झाला आहे. या चांगल्या कामगिरीबद्दल महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे, सहायक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) महेश पाटील तसेच करनिर्धारण व संकलन खात्यातील अधिकारी, कर्मचारी आणि विभाग कार्यालय स्तरावर कार्यरत सर्व संबंधित अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
भांडवली मूल्य आधारित मालमत्ता कर प्रणालीचा निर्णय मुंबई महापालिकेच्या विरोधात गेल्याने २०१५ पासून वसूल केलेल्या महसुलातील कराची रक्कम करदात्यांना परत देण्याची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक कारदात्यांच्या करांचे पैसे हे यापुर्वी वसूल केलेल्या रकमेतून समायोजित करण्यात येत आहे. त्यामुळे या वर्षी निश्चित रक्कम वसूल होईल का याबाबत धास्ती होती. परंतु सहआयुक्त सुनील धामणे यांनी सहायक आयुक्त महेश पाटील तसेच त्यांच्या टीम सोबत वारंवार बैठक घेऊन कर वसुलीच्या कामाचा आढावा घेत त्यांच्याकडून ही रक्कम कशाप्रकारे वसूल होईल यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे यंदा किमान ७७५ कोटीची अधिक वसुली होऊ शकली.
Join Our WhatsApp Community