ठाण्यात नववर्ष स्वागतयात्रेत झळकणार स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा चित्ररथ 

99

गुढीपाडवा हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी राज्यभर ठिकठिकाणी स्वागतयात्रांचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत असते. त्याप्रमाणे ठाण्यातही मानपाडा येथे प्रथमच नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा चित्ररथही सहभागी होणार आहे.

कसा असेल चित्ररथ? 

या स्वागतयात्रेत सहभागी होणार असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या चित्ररथामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली त्या अंदमानातील सेल्युलर जेलची प्रतिकृती असणार आहे. तसेच सेल्युलर जेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सहन केलेल्या यातना याविषयीची माहिती चित्र रूपात देण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेली पुस्तके, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी राष्ट्र आणि धर्म यांसंबंधी लिहिलेली उद्बोधक वाक्ये, भारतमातेचे चित्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तयार केलेला हिंदू ध्वज असणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे विश्वस्त शैलेंद्र चिखलकर यांच्या वतीने हा चित्ररथ या शोभायात्रेत सहभागी करून घेण्यात येणार आहे.

(हेही वाचा “मशिदींची मुजोरी संपवावी…” राज ठाकरेंच्या गुढीपाडवा मेळाव्याचा दुसरा टीझर; पहा संपूर्ण व्हिडिओ)

कशी असेल शोभायात्रा? 

सार्वजनिक उत्सव मंडळ आणि भारतीय नववर्ष स्वागत उत्सव समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच यंदाच्या वर्षी ही स्वागतयात्रा आयोजित करण्यात आली आहे. नीळकंठेश्वर मंदिर, टिकुजीनी वाडीपासून सुरु होणारी ही स्वागतयात्रा पुढे  कल्पतरू हिल्स, बुद्धदेव विहार, हिल गार्डन, कोकणीपाडा, गार्डन इस्टेट, खेवरा सर्कल, व्हॅली टॉवर, कॉसमॉस हेरिटेज, हॅपी व्हॅली, सहयोग, शुभारंभ, एकमे ओझोन, इडन वुड्स, डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह, हिरानंदानी मेडोज, हाईडपार्क, सूर्या टॉवर, कॉसमॉस लॉज, दि व्हेरिएशन, नीलकंठ ग्रीनपासून श्री सत्यशंकर रेसिडेन्सी, नीळकंठेश्वर महादेव मंदिर नीलकंठ ग्रीन्स येथे ही यात्रा समाप्त होणार आहे.

प्रल्हाद बोरसे, शशिकुमार नायर, राजू मठद, हंसराज खेवरा, दीपक मेजारी, गिरीश गायकवाड, नरेंद्र जोशी, किशोर ओवळेकर, अरविंद कारेकर, रामबाबू सिंग, निलेश अहिरराव, सुरेश शिंगाडे, प्रकाश शेळके, रणजित चव्हाण, सुनिल काब्रा, गौतम दिघे, विजयालक्ष्मी भट, नीता कलोरे, सायली साळवी, रजनी पितळे, प्रणाली कोबल या सर्वांनी या यात्रेचे आयोजन केले आहे. हॅपी व्हॅली फेडरेशन कॉम्प्लेक्सचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांचे यासाठी सहकार्य लाभणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.