वक्तृत्व हा सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा एक महत्त्वाचा पैलू होता. लेखन आणि वक्तृत्व या गुणांच्या बळावर सावरकरांनी आपल्या विचारांचा प्रचार आणि प्रसार केला. हिंदुत्व, पूर्वास्पृश्यता निवारण, जातीभेद निवारण, राजकारण इत्यादी चळवळींना सावरकरांनी वक्तृत्वाच्या जोरावर अनेकानेक लोकांपर्यंत पोहोचवले. सावरकरांचे वक्तृत्व कसे होते, त्यांच्या वक्तृत्वाची वैशिष्ट्ये काय होती यावर आपण याआधीच चर्चा केलेली आहे. सावरकरांनी ज्याप्रमाणे त्यांना अभिप्रेत असलेल्या विचारांचा प्रचार वक्तृत्वाच्या माध्यमातून केला, त्याचप्रमाणे सावरकरी विचारांचा प्रचार व्हायला हवा.
( हेही वाचा : देशभक्त गणेशपंत दामोदर उपाख्य बाबाराव सावरकर)
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर सतत खोटे आरोप होत असतात. प्रत्येक वेळी आपण त्यांचे मुद्दे खोडून काढतो आणि प्रत्येक वेळी विरोधक तेच तेच मुद्दे रेटत असतात. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट आहे की या विरोधकांना चर्चा करायची नाही, तर केवळ वाद निर्माण करायचा आहे. म्हणून नेहमी त्यांच्या आरोपांना थेट उत्तर देण्यापेक्षा आपल्याला वेगळ्या पद्धतीने त्यांना उत्तर देता येईल असा विचार करण्यात आला आणि ‘मी सावरकर’ ही ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेचे यंदाचे ६ वे वर्ष होते.
‘मी सावरकर’ या स्पर्धेमुळे अनेक सावरकरप्रेमी बोलते झाले. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्व जण या अनोख्या स्पर्धेत सहभागी होतात. ही स्पर्धा म्हणजे जणू सावरकरी विचारांचे वक्ते घडवण्याची कार्यशाळाच आहे. अशा प्रकारच्या अनेक स्पर्धा भरवण्यात आल्या पाहिजेत. त्याचबरोबर सावरकरी विचारांचे वक्ते तयार करण्यासाठी कार्यशाळेचे देखील आयोजन केले पाहिजे. याचे कारण म्हणजे आपल्याकडे मुद्देसूद आणि हिंदुत्वाच्या दृष्टीकोनातून बोलणारे खूप कमी वक्ते उपलब्ध आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेल्या स्वराज्य या संकल्पनेवर आधारित आहे.
त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार झालाच पाहिजे. आज देश त्यांच्या विचारांवर चालतोय, हे महत्त्वाचे आहे. उद्या जर सावरकरी विचारांचे अनेक वक्ते निर्माण झाले तर देशात एक प्रकारचे सकारात्मक वातावरण निर्माण होईल. सावरकरांचे विचार जनमानसात रुजले तर भारताची प्रगती होणार आहे. भारताकडे कुणीही वाकड्या नजरेने पाहण्याचा प्रयत्न देखील करणार नाही. म्हणून सावरकरी विचारांचे वक्ते घडायला हवेत.
Join Our WhatsApp Community