‘सत्तेला लाथ मारायची उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत नाही. त्याच्यामुळे केवळ भाषणांमध्ये वीर सावरकर जिवंत राहतील, कृतीमध्ये वीर सावरकर दिसणार नाहीत,’ असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.
मालेगावमध्ये रविवारी झालेल्या जाहीर सभेत उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींना इशारा दिला होता. ‘वीर सावरकर आमचे दैवत आहे, त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही’ असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. याच पार्श्वभूमीवरून देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. यावेळी उद्धव ठाकरेंची ही भूमिका विधानभवनात फडणवीस यांच्यासोबत चालत गेल्यामुळे बदलली का? असा प्रश्न विचारता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘माझ्यासोबत चालत आल्यामुळे जर भूमिका बदलत असेल तर मी रोज काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सेनेच्या एकेका नेत्याला दरवाज्यापासून ते विधानभवनापर्यंत सोबत चालत नेईन, म्हणजे ते सगळे वीर सावरकर की जय म्हणतील.’
तसेच फडणवीस पुढे म्हणाले की, ‘मला असे वाटते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले ते खरे आहे. सत्तेला लाथ मारायची त्यांच्यामध्ये हिंमत नाही. त्याच्यामुळे केवळ भाषणांमध्ये वीर सावरकर जिवंत राहतील, कृतीमध्ये वीर सावरकर दिसणार नाही. पण ज्याप्रकारे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेय शिवसेना, भाजप प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघामध्ये एकीकडे राहुल गांधींचा निषेध करेल. तर दुसरीकडे वीर सावरकर गौरव यात्रा काढेल. या यात्रेतून सावरकरांनी केलेले कार्य हे समाजासमोर पुन्हा एकदा आम्ही आणू आणि त्यांचा गौरव करू.’
(हेही वाचा – राहुल गांधींच्या थोबाडात मारणार का? मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल)
Join Our WhatsApp Community