स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांना मातृशोक 

91

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे विक्रमराव सावरकर यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी विक्रमराव सावरकर यांचे मंगळवार, २१ मार्च रोजी पुणे येथे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी त्या ८४ वर्षांच्या होत्या. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ देणाऱ्या स्वामिनी सावरकर या अखेरपर्यंत सामाजिक कार्यात सक्रिय होत्या. त्यांच्या पार्थिवावर मंगळवारी संध्याकाळी ७ वाजल्यानंतर पुण्यातील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी तीन भावंडे आणि त्यांच्या पत्नींनी संपूर्ण आयुष्य समर्पित केले. असे एकमेव उदाहरण म्हणजे सावरकर कुटूंब. बाबाराव सावरकर, नारायणराव सावरकर आणि स्वातंत्र्यवीर विनायक सावरकर अशी ही तीन भावंडे होती. या क्रांतिकारकांचा जाज्वल्य विचारांचा वारसा स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुतणे आणि डॉ. नारायणराव सावरकर यांचे पुत्र विक्रमराव सावरकर यांनी पुढे नेला. विक्रमराव सावरकर यांच्या व्रतस्थ जीवनाला खंबीरपणे साथ मिळाली ती त्यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांची! स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांच्या मातोश्री स्वामिनी सावरकर यांनी ‘सावरकर कुटुंबासाठी’ संपूर्ण आयुष्य समर्पित केले.

स्वामिनी विक्रम सावरकर यांना पृथ्वीराज विक्रम सावरकर आणि रणजित विक्रम सावरकर अशी दोन मुले. मोठा मुलगा पृथ्वीराज हे पुण्यात राहत होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. त्यांचे कुटुंब पुण्यात राहते. तर धाकटा मुलगा रणजित सावरकर हे मुरबाड येथे राहतात. गेली अनेक वर्षे ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष आहेत.

(हेही वाचा स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर कुटुंबासह समस्त राष्ट्रभक्तांची अपरिमित हानी)

आयुष्याच्या शेवटच्या दिवसात, स्वामिनी सावरकर ह्या त्यांचा मोठा मुलगा पृथ्वीराज यांच्या कुटुंबासह पुण्यात राहत होत्या. सून मृणालिनी सावरकर या स्वामिनी यांची सेवा करत होत्या. स्वामिनी यांनी पती विक्रम सावरकर यांच्यासोबत प्रज्वलंत नावाच्या वृत्तपत्राचे काम सांभाळले. यासोबतच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचे कामही स्वामिनी सावरकर यांनी पाहिले, जिथे त्या आपला धाकटा मुलगा रणजित सावरकर यांच्यासोबत राहत होत्या. गेल्या आठवड्यात स्वामिनी सावरकर यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. वार्धाक्य आणि त्यामुळे ढासळत चाललेली प्रकृती यामुळे त्यांच्या शरीराने अखेर औषधोपचारांना प्रतिसाद देणे बंद केले. परिणामी प्राणशक्ती क्षीण होऊ लागली आणि त्यांचा आत्मा अखेर शरीराच्या बंधनातून मुक्त झाला.

स्वामिनी विक्रम सावरकर यांचा जन्म नागपूरच्या पांडुरंग गोखले यांच्या कुटुंबात १८ डिसेंबर १९३९ रोजी झाला. त्यांचे माहेरचे नाव मंदाकिनी पांडुरंग गोखले होते, त्यांना तीन बहिणी आणि एक भाऊ होता. आईचे नाव मनोरमा पांडुरंग गोखले. मंदाकिनी गोखले यांचा विवाह ११ मे १९५८ रोजी विक्रम नारायणराव सावरकर यांच्याशी झाला. मंदाकिनी गोखले यांचे सावरकर कुटुंबात स्वामिनी म्हणून आगमन झाले आणि तेव्हापासून सामाजिक कार्य, संपादन कार्य यासह विविध क्षेत्रात त्या स्वामिनी विक्रम सावरकर म्हणून ओळखल्या जात आहेत.

(हेही वाचा स्वामिनी सावरकरांचे निधन : सावरकर विचारांचा मार्गदर्शक आधारस्तंभ ढासळला )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.